PM नरेंद्र मोदी आजपासून UAE दौऱ्यावर, पहिल्या हिंदू मंदिराचे करणार उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 09:52 AM2024-02-13T09:52:35+5:302024-02-13T10:17:01+5:30
Narendra Modi : नरेंद्र मोदी यांचा हा 2015 पासून यूएईचा सातवा दौरा असणार आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदीसंयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) दोन दिवसीय दौऱ्यावर आजपासून जात आहेत. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यूएईचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करतील. तसेच, अबुधाबी येथील पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन करतील.
नरेंद्र मोदी यांचा हा 2015 पासून यूएईचा सातवा दौरा असणार आहे. यूएईच्या या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी अबूधाबी मधील पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन आहेत. याशिवाय यूएईचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्याशी दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी अधिक सखोल, विस्तारित आणि मजबूत करण्याच्या मार्गांवर चर्चा करतील.
परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्र मोदी यूएईचे उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांचीही भेट घेतील. त्यांच्या निमंत्रणावरून नरेंद्र मोदी दुबई येथे होणाऱ्या जागतिक सरकारी शिखर परिषदेत 2024 मध्ये सन्माननीय पाहुणे म्हणून सहभागी होतील आणि शिखर परिषदेत विशेष भाषण करतील. तसेच, नरेंद्र मोदी अबू धाबीतील पहिले हिंदू मंदिर असलेल्या बीएपीएस मंदिराचे उद्घाटनही करतील आणि झायेद स्पोर्ट्स सिटी येथे एका कार्यक्रमात यूएईमधील भारतीय समुदायाला संबोधित करतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमांचे वेळापत्रक
13 फेब्रुवारी
- नरेंद्र मोदी 11.30 वाजता दिल्लीहून यूएईला रवाना होतील.
- नरेंद्र मोदी दुपारी 4 वाजता अबुधाबीला पोहोचतील.
- अबुधाबीमध्ये दुपारी 4 ते 5:30 दरम्यान द्विपक्षीय चर्चा होणार आहे.
- रात्री 8 ते 9.30 या वेळेत अहलान मोदी समुदायाचा कार्यक्रम होईल, जिथे नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान उपस्थित राहणार आहेत.
14 फेब्रुवारी
परराष्ट्र मंत्रालयाची ब्रीफिंग अबुधाबीमध्ये सकाळी 9.20 वाजता होणार आहे.
नरेंद्र मोदी दुपारी 1.50 ते 2.10 या वेळेत वर्ल्ड गव्हर्नमेंट समिटमध्ये सहभागी होतील.
संध्याकाळी 6 ते 9 या कार्यक्रमात नरेंद्र मोदी यूएईमधील बीएपीएस मंदिराचे उद्घाटन करतील.