राज्यसभेतून विरोधकांचा वॉकआउट; PM मोदी म्हणाले, "खोटं पसरवणारे, सत्य ऐकू शकत नाहीत"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 02:16 PM2024-07-03T14:16:55+5:302024-07-03T14:18:57+5:30

विरोधकांनी वेलमध्ये उतरत घोषणाबाजी केली. या सर्व प्रकारावर संतापून राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी विरोधकांना समज दिली. यानंतर विरोधकांनी सभात्याग केला. 

narendra modi rajya sabha speech, reply motion of thanks president, opposition uproar parliament session, bjp vs india alliance constitution | राज्यसभेतून विरोधकांचा वॉकआउट; PM मोदी म्हणाले, "खोटं पसरवणारे, सत्य ऐकू शकत नाहीत"

राज्यसभेतून विरोधकांचा वॉकआउट; PM मोदी म्हणाले, "खोटं पसरवणारे, सत्य ऐकू शकत नाहीत"

नवी दिल्ली : राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी उत्तर दिले. राज्यसभेत नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणादरम्यान काँग्रेसवर निशाणा साधला. यावेळी विरोधकांनी वेलमध्ये उतरत घोषणाबाजी केली. या सर्व प्रकारावर संतापून राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी विरोधकांना समज दिली. यानंतर विरोधकांनी सभात्याग केला. 

विरोधकांनी सभागृहातून सभात्याग केल्यानंतर नरेंद्र मोदी म्हणाले की, सभागृहातून बाहेर पडणे हे त्यांचे भाग्य आहे. खोटं पसरवणारे, सत्य ऐकू शकत नाहीत. या लोकांना सत्य पचवता येत नाही. यामुळे ते सभागृह सोडून पळून जात आहेत. मी माझ्या कर्तव्याशी संलग्न आहे. मला प्रत्येक क्षणाचा हिशोब देशवासियांना द्यायचा आहे. तिसऱ्यांदा संधी मिळणे ऐतिहासिक आहे. खासदारांनी सभागृहाची प्रतिष्ठा वाढवली आहे. तसेच, गेल्या अडीच दिवसांत सुमारे ७० खासदारांनी या चर्चेत भाग घेतला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला तुम्ही दिलेल्या योगदानाबद्दल मी तुम्हा सर्व खासदारांचे आभार मानतो, असे नरेंद्र मोदी म्हणाले. 

काँग्रेसवर हल्लाबोल करताना नरेंद्र मोदी म्हणाले, भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासातील आपल्या संसदीय लोकशाही प्रवासात अनेक दशकांनंतर देशातील जनतेने एका सरकारला सलग तिसऱ्यांदा सेवेची संधी दिली आहे. ६० वर्षांनंतर असे झाले आहे की, सरकार १० वर्षांपर्यंत सत्तेत राहिल्यानंतर पुन्हा परतले आहे. ही काही सामान्य गोष्ट नाही. जनतेने दिलेल्या या निर्णयाला काही लोकांनी जाणीवपूर्वक कलंकित करण्याचा प्रयत्न केला.

नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, "मला काही काँग्रेस सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानायचे आहेत. निकाल आल्यापासून एका सहकाऱ्याकडून (जरी त्यांचा पक्ष त्यांना पाठिंबा देत नसला तरी) एक तृतीयांश सरकार स्थापन होईल, असे वारंवार सांगितले जात होते. १० वर्षे उलटून गेली आणि अजून २० बाकी आहेत यापेक्षा मोठे सत्य काय असू शकते. एक तृतीयांश झाले, अजून दोन तृतीयांश बाकी आहेत. त्यामुळे त्यांच्या या भविष्यवाणीसाठी त्यांच्या तोंडात तूप आणि साखर."

आम्हाला मेहनत करायची आहे. येत्या पाच वर्षांत मूलभूत सुविधांच्या सॅच्युरेशनवर लक्ष केंद्रित केले जाईल. पुढील पाच वर्षे गरिबीविरुद्ध निर्णायक लढा देणार आहे. गरिबीविरुद्धची लढाई आपण जिंकू. मी माझ्या १० वर्षांच्या अनुभवावरून बोलत आहे की, जेव्हा देश जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल तेव्हा त्याचा परिणाम जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रावर होईल. या काळात तुम्हाला विस्ताराच्या अनेक संधी मिळतील, असे नरेंद्र मोदींनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "आम्ही शेतीकडे सर्वसमावेशकपणे पाहिले आहे आणि मच्छिमारांना किसान क्रेडिट कार्ड देखील दिले आहेत. काँग्रेसच्या कार्यकाळात १० वर्षातून एकदाच शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जात होती आणि त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात होता. ६० हजार कोटींच्या कर्जमाफीबाबत एवढा गदारोळ झाला होता. त्याचे लाभार्थी फक्त तीन कोटी शेतकरी होते. गरीब शेतकऱ्याचा नाव सुद्धा नव्हते. त्यांना काही फायदाही होऊ शकला नाही."

Web Title: narendra modi rajya sabha speech, reply motion of thanks president, opposition uproar parliament session, bjp vs india alliance constitution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.