सोनियांसाठी सीताराम केसरींना अध्यक्षपदावरून मुदतीपूर्वीच हटविले - नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 04:20 AM2018-11-19T04:20:55+5:302018-11-19T04:21:05+5:30
सोनिया गांधी यांना काँग्रेसचे अध्यक्ष बनवायचे असल्यामुळे त्यांच्या आधी या पदावर विराजमान असलेले दलित नेते सीताराम केसरी यांना अध्यक्षपदाची मुदत पूर्ण होण्याआधीच हटविण्यात आले, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केला.
महासमुंद : सोनिया गांधी यांना काँग्रेसचे अध्यक्ष बनवायचे असल्यामुळे त्यांच्या आधी या पदावर विराजमान असलेले दलित नेते सीताराम केसरी यांना अध्यक्षपदाची मुदत पूर्ण होण्याआधीच हटविण्यात आले, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केला.
छत्तीसगढमधील विधानसभा निवडणुकांच्या दुसऱ्या व अखेरच्या टप्प्यासाठी २० नोव्हेंबरला मतदान होत आहे. त्याआधी घेतलेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. गांधी घराण्यातील व्यक्तींऐवजी काँग्रेसमधील एखाद्या निष्ठावंत कार्यकर्त्याला पक्षाध्यक्ष करून दाखवाच असे खुले आव्हान मोदी यांनी दिले होते. त्यावर गांधी घराण्यातील नसलेल्या १५ काँग्रेस अध्यक्षांची नावे नमुद करून माजी वित्तमंत्री पी. चिदम्बरम यांनी मोदींना चोख प्रत्युत्तर दिले होते.
त्या पार्श्वभूमीवर मोदी म्हणाले की, गांधी घराण्यातील चार पिढ्यांनी देशावर सत्ता गाजवली व त्याचे लाभही घेतले. मात्र त्यांच्या राजवटीमुळे देशाचे काहीही कल्याण झाले नाही. याआधी दिल्लीमधील सरकार गांधी घराण्याच्या हाती असलेल्या रिमोट कंट्रोलद्वारे चालविले जायचे. काँग्रेसच्या अध्यक्षपदी गांधी घराण्यातील नव्हे तर त्या पक्षातील सक्षम कार्यकर्त्याला विराजमान करून दाखवाच असे आव्हान मोदींनी दिले.
गांधी घराण्याची सत्ता देशात असताना सर्वसामान्य जनतेच्या भवितव्याचा विचार केला जात नव्हता. आपल्याच घराण्याची धन करण्याकडे त्यातील लोकांचे लक्ष होते. त्यामुळे यापुढे ते लोकांच्या आशाआकांक्षा पूर्ण करतील या गोष्टीवर कसा विश्वास ठेवायचा असा सवालही नरेंद्र मोदींनी विचारला. ते म्हणाले की, काँग्रेस केंद्रात सत्तेवर असताना छत्तीसगढचे विद्यमान मुख्यमंत्री रमणसिंह यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. काँग्रेसने छत्तीसगढवर नेहमीच अन्याय केला.