"पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील दुसऱ्या क्रमांकाचे लोकप्रिय नेते, अमेरिका अन् फ्रान्सलाही टाकले मागे"
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 08:49 PM2020-04-25T20:49:37+5:302020-04-25T21:02:53+5:30
YouGov या पोलिंग एजन्सीने व्हियतनामचे राष्ट्रपती गुएन फू त्रोंग यांना पहिले स्थान दिले असून, ते कोरोनाचा सामना करण्याच्या बाबतीत जगातील पहिल्या क्रमांकाचे लोकप्रिय नेते असल्याचे म्हटले आहे. या सर्व्हेमध्ये फ्रान्स, अमेरिका, स्पेन, इटली आणि इंग्लंडमधील सरकारांची रँकिंग भारताच्या फार मागे आहे.
लंडन :इंग्लंडमधील एका प्रसिद्ध पोलिंग एजन्सीने कोरोनाचा सामना करण्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकप्रिय नेते असल्याचे म्हटले आहे. YouGov, असे या पोलिंग एजन्सीचे नाव आहे. या एजन्सीने व्हियतनामचे राष्ट्रपती गुएन फू त्रोंग यांना पहिले स्थान दिले असून, ते कोरोनाचा सामना करण्याच्या बाबतीत जगातील पहिल्या क्रमांकाचे लोकप्रिय नेते असल्याचे म्हटले आहे.
या एजन्सीने म्हटल्याप्रमाणे, 92 टक्के भारतीयांना वाटते, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरसचा सामना चांगल्या प्रकारे अथवा खूपच चांगल्या प्रकारे केला. तर व्हियतनाममधील 93 टक्के लोकांना वाटते, की तेथील सरकार कोरोनाचा सामना खूप चांगल्या प्रकारे करत आहे. इंग्लंडमधील YouGov ही इंटरनेटवर आधारीत मार्केट आणि डाटाचे विश्लेषण करणारी कंपनी आहे. या कंपनीने हा निष्कर्ष 20 फेब्रुवारी ते 23 एप्रिल या काळातील आकड्यांच्या आधारे लावला आहे.
भारताने अमेरिका-फ्रान्सलाही टाकले मागे -
या सर्व्हेमध्ये फ्रान्स, अमेरिका, स्पेन, इटली आणि इंग्लंडमधील सरकारांची रँकिंग भारताच्या फार मागे आहे. या सर्वेत फ्रान्समधील केवळ 38 टक्के लोकांनाच वाटते, की तेथील सरकार चांगले काम करत आहे. अमेरिकेतील हा आकडा 49 टक्के आहे. याचा अर्थ तेथील अर्ध्याहून कमी लोक ट्रम्प यांचे समर्थन करत आहेत. अमेरिकेत आतापर्यंत कोरोनामुळे जवळपास 50 हजार लोकांचा मृत्यू झाल आहे.
अमेरिकेतील एजन्सीने दिला होता पहिला क्रमांक -
यापूर्वी अमेरिकेतील ग्लोबल डेटा इंटेलिजन्स कंपनी मार्निंग कंसल्ट एजन्सीने आपल्या रेटिंगमध्ये कोरोनाचा सामना करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहिला क्रमांक दिला होता. या एजन्सीने, जगातील नेत्यांची कोरोनाचा सामना करण्याची क्षमता आणि त्यांच्यावरील लोकांचा विश्वास याचा अभ्यास करत, ही रेटिंग जारी केली होती. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी 68 अप्रुव्हल प्वॉइंट्सने पहिल्या स्थानावर होते.