नरेंद्र मोदी, शहा यांनी नागरिकांची दिशाभूल केली - मल्लिकार्जुन खरगे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2019 02:53 AM2019-12-29T02:53:53+5:302019-12-29T06:33:37+5:30
काँग्रेसचा शांती मोर्चा; स्थापना दिनानिमित्त राज्यभर कार्यक्रम
मुंबई : देशातील प्रत्येक नागरिकाच्या खात्यात १५ लाख रुपये, दरवर्षी दोन कोटी रोजगार, नागरिकत्व सुधारणा कायदा व एनआरसीच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी जनतेची दिशाभूल केली आहे. त्यामुळेच मोदी, शहा हे खोटारड्यांचे सरदार असल्याची टीका काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी केली.
काँग्रेसच्या स्थापना दिवसानिमित्त शनिवारी सकाळी ‘देश वाचवा संविधान वाचवा’ शांती मार्च ऑगस्ट क्रांती मैदान येथील तेजपाल सभागृह ते गिरगाव चौपाटीवरील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ््यापर्यंत काढण्यात आला. ऑगस्ट क्रांती मैदानाशेजारील गोकुळदास तेजपाल सभागृहात १८८५ मध्ये काँग्रेसची स्थापना झाली.
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी भाजपला ‘चले जाव’चा इशारा दिला. भाजपचे सरकार काहीतरी चांगले करण्याऐवजी संविधानाचे तुकडे करण्याचे काम करत आहे, असा आरोप त्यांनी केला.
तेजपाल सभागृह येथे खरगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर आॅगस्ट क्रांती मैदानातील गांधी स्मृती स्तंभाला अभिवादन करून लोकशाही व संविधानविरोधी केंद्रातील भाजप सरकारविरोधात मोर्चा काढण्यात आला. विल्सन महाविद्यालयाजवळ या मोर्चाचे सभेत रुपांतर झाले.
खरगे म्हणाले, मुंबईत काँग्रेसची स्थापना झाली. १९४२ च्या चलेजाव आंदोलनाची सुरुवात याच मुंबईतून झाली. संविधानाच्या मार्गाने देशात लोकशाही रुजवली व वाढविण्याचे काम काँग्रेसने केले. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशाऱ्यावर चालणाºया भाजपने संविधान बदलण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. देशात धार्मिक फूट पाडून अराजकता पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे त्यांना ‘चले जाव’ सांगण्यासाठी देश वाचवा संविधान वाचवा मोर्चा काढण्यात आल्याचे खरगे म्हणाले.
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विधानपरिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री डॉ. नितीन राऊत, आ. यशोमती ठाकूर, आ.डॉ. विश्वजीत कदम, मुझफ्फर हुसेन, आ. अमित देशमुख, वर्षा गायकवाड, भाई जगताप, प्रणिती शिंदे, अस्लम शेख, अमिन पटेल, झिशान सिद्दिकी, खा. हुसेन दलवाई, कुमार केतकर, माजी खा. भालचंद्र मुणगेकर, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, सचिन सावंत आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजपचा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही
काँग्रसेच प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले, काँग्रेसने सर्व जातीधर्माच्या गरीब, श्रीमंत अशा समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. स्वातंत्र्यानंतर राज्यघटनेच्या माध्यमातून सर्वांना समान संधी, न्याय व व्यक्तिस्वातंत्र्य दिले. संविधानाने जनतेला दिलेले अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न केंद्रातील भाजप सरकार करत आहे.
भाजप युवा मोर्चाचा सवाल
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ काढलेल्या तिरंगा मार्चला पोलिसांनी परवानगी नाकारली. मात्र त्याच आॅगस्ट क्रांती मैदानात निघालेल्या काँग्रेसचा रॅलीला पोलिसांनी परवानगी दिली कशी? असा सवाल भाजप युवा मोर्चाने केला.