नरेंद्र मोदी सरकार आता घालवायलाच हवे !
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2019 05:46 AM2019-04-07T05:46:43+5:302019-04-07T05:46:54+5:30
सोनिया गांधी । देशातील घटनात्मक संस्था नष्ट करण्याचा प्रयत्न
नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरूंसह अनेक नेत्यांनी स्थापन केलेल्या घटनात्मक संस्था नेस्तनाबूत करण्याचे कारस्थान गेल्या ५ वर्षांपासून सुरू असून लोकशाहीच्या आधारस्तंभ असलेल्या या संस्थांचे अस्तित्व टिकविण्यासाठी मोदी सरकारची गच्छंती आवश्यक असल्याचे मत यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शनिवारी दिल्लीत व्यक्त केले.
सिव्हिल सोसायटीने आयोजिलेल्या ‘जनसरोकार’ संमेलनात सोनिया गांधी यांनी
मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. मोदी सरकारच्या विरोधात सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचे सांगून त्या म्हणाल्या, मोदी सरकारच्या या देशाच्या आत्म्यावरच आघात केले आहेत. गेल्या ७० वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या साऱ्या घटनात्मक संस्थांचे अस्तित्व संपवून टाकले आहे. देशाच्या विविधतेला विरोध करणारे स्वत:ला देशभक्त व इतरांना देशद्रोही म्हणत आहेत. लोकांच्या वेशभूषा व खानपानावर आक्षेप घेतले जात आहे.
यूपीएच्या काळात सिव्हिल सोसायटीच्या सहकार्याने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. सोसायटीच्या सदस्यांना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार परिषदेमध्ये स्थान दिले होते. परंतु सध्या काही उद्योजकांचे हित जोपासले जात आहे. सर्वसामान्य लोकांचे जीवनाची या सरकारचा काहीही संबंध राहिलेला नाही. सर्वसामान्य लोकांचे प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणण्यासाठी पुन्हा पुरोगामी विचाराचे सरकार सत्तेवर येण्याची गरज असल्याचे सोनिया गांधी यांनी सांगितले.
संमेलनाला सोनिया गांधी यांनी हजेरी लावली. यावेळी कम्युनिस्ट पक्षाचे सीताराम येचुरी, डी. राजा, कविता कृष्णन, खासदार मनोज झा आदी उपस्थित होते. संचालन सुनीलम यांनी केले.