"५ वर्षात ५ पंतप्रधान, पंतप्रधानांच्या खुर्चीचा लिलाव…", मोदींनी सांगितला इंडिया आघाडीचा फॉर्म्युला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 10:22 AM2024-04-25T10:22:10+5:302024-04-25T10:30:47+5:30
Lok Sabha Election 2024 : जर इंडिया आघाडीचे सरकार आले तर पंतप्रधानपदासाठी निवड कशी होईल, याबाबत नरेंद्र मोदींनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार प्रचार करत आहेत. मध्य प्रदेशातील बैतुलमध्ये नरेंद्र मोदींनी काँग्रेससह विरोधकांच्या इंडिया आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी जर इंडिया आघाडीचे सरकार आले तर पंतप्रधानपदासाठी निवड कशी होईल, याबाबत नरेंद्र मोदींनी सांगितले. तसेच, काँग्रेसने देशातील जनतेची संपत्ती हिसकावण्याची तयारी सुरू केल्याचा दावा त्यांनी केला आहे. याशिवाय, कर्नाटकातील ओबीसी आरक्षणाचा मुद्दाही नरेंद्र मोदींनी उपस्थित केला.
नरेंद्र मोदी म्हणाले, "इंडिया आघाडीमध्ये चर्चा सुरू आहे की, इंडिया आघाडी एक वर्ष एक पीएम फॉर्म्युला तयार करत आहे, असे काही मीडिया रिपोर्ट्समध्ये आले आहे. म्हणजे एक वर्ष एक पंतप्रधान, दुसऱ्या वर्षी दुसरा पंतप्रधान, तिसऱ्या वर्षी तिसरा पंतप्रधान चौथ्या वर्षी वर्षाचे चौथा पंतप्रधान आणि पाचव्या वर्षी पाचवा पंतप्रधान. अशा प्रकारे ते पंतप्रधानांच्या खुर्चीचा लिलाव करण्यात व्यस्त आहेत."
काँग्रेसचा धोकादायक छुपा अजेंडा आता उघडपणे समोर आला आहे. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली काँग्रेस व्होट बँकेचे राजकारण करत आहे. त्यांनी सामाजिक न्यायाची मूलभूत भावनेची हत्या केली आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच, काँग्रेस पक्ष दलित, मागासवर्गीय आणि आदिवासींचा द्वेष करतो. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसला सर्वात मोठा विरोध बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. काँग्रेस देशाला अधोगतीच्या मार्गावर कशी नेत आहे, हे बाबासाहेबांनी त्यावेळी पाहिले होते, असे नरेंद्र मोदींनी सांगितले.
कर्नाटकात ओबीसींना आरक्षण मिळते, असे त्यांचे म्हणणे आहे. ओबीसी कोट्यातील आरक्षणाचा वाटा हिसकावून घेण्यासाठी काँग्रेसने राज्यातील सर्व मुस्लिमांना ओबीसी केले. काँग्रेसची ही कृती संपूर्ण देशातील ओबीसी समाजासाठी धोक्याची घंटा आहे. काँग्रेस आपल्या जाहीरनाम्यात धर्मावर आधारित आरक्षणावर सतत बोलत असते. तेलंगणातील काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी मुस्लिमांना आरक्षण मिळेल, असे नाव घेऊन सांगितले, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
काँग्रेसकडून जनतेची संपत्ती हिसकावण्याची तयारी - नरेंद्र मोदी
याचबरोबर, काँग्रेस आपली व्होट बँक खूश करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते. आता काँग्रेसने देशातील जनतेची संपत्ती हिसकावून आपली व्होट बँक मजबूत करण्याची तयारी सुरू केली आहे. जर कोणाकडे एकापेक्षा जास्त कार, मोटारसायकल, घर असेल, तर त्या काँग्रेसचे सरकार आल्यानंतर सरकार जप्त करेल, असे नरेंद्र मोदी म्हणाले.