मोदींनी विरोधकांना फटकारले; म्हणाले, विरोध करण्यासाठी खूप मुद्दे, विरोध झाला पाहिजे, पण....
By बाळकृष्ण परब | Published: February 8, 2021 11:09 AM2021-02-08T11:09:12+5:302021-02-08T11:11:20+5:30
Narendra Modi LIVE Updates: कोरोनाकाळात आपण अज्ञात शत्रूविरोधात लढत होतो. हा अज्ञात शत्रू काय करू शकतो याचा कुणाला अंदाज नव्हता. कुणी कुणाची मदत करू शकत नव्हते.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावादरम्यान आज राज्यसभेमध्ये संबोधन देत उत्तर दिले आहे. कोरोनाकाळ आणि शेतकरी आंदोलनादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राज्यसभेमध्ये काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच मोदींनी कोरोनाकाळात केलेल्या विरोधावरून विरोधी पक्षांना फटकारले आहे.
मोदी राज्यसभेमधील आपल्या संबोधनात म्हणाले की, कोरोनाकाळात आपण अज्ञात शत्रूविरोधात लढत होतो. हा अज्ञात शत्रू काय करू शकतो याचा कुणाला अंदाज नव्हता. कुणी कुणाची मदत करू शकत नव्हते. अशा काळात आपण कोरोनाविरोधातील लढाई लढली. मात्र अशा परिस्थितीतही काही जणांकडून विरोध होत होता. कोरोनाकाळात एका वृद्ध आईने झोपडीबाहेर दिवा पेटवला. मात्र त्याचीही खिल्ली उडवली गेली. विरोध करण्यासाठी खूप मुद्दे आहेत. विरोध झाला पाहिजे. मात्र देशाचं मनोबल तोडणारा विरोध नको. देशाच्या मनोधैर्यावर, सामर्थ्यावर आघात करणारा विरोध नको, असा टोलाही मोदींनी विरोधकांना लगावला.
#WATCH LIVE: PM Modi replies in Rajya Sabha to the Motion of Thanks on the President’s Address.(Source: Rajya Sabha TV) https://t.co/FkIpRmd9kN
— ANI (@ANI) February 8, 2021
मोदी म्हणाले की, कोरोनाचे संकट आले तेव्हा संपूर्ण जग भारतासाठी चिंतीत होते. जर भारत सावरला नाही तर जगाला संकट निर्माण होईल, असे म्हटले जात होते. तेव्हा भारताने आपल्या देशाच्या नागरिकांचे रक्षण करण्यासाठी एका अज्ञात शत्रूसोबत लढाई लढली. मात्र आज भारताने ही लढाई जिंकल्याने जग अभिमान बाळगत आहे. ही लढाई कुठले सरकार किंवा व्यक्तीने लढलेली नाही. मात्र याचं श्रेय भारताला जातं, असे नरेंद्र मोदी म्हणाले.