Coronavirus : पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती पुतीन यांच्यात महत्वपूर्ण चर्चा, फोनवरून साधला संवाद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 12:02 AM2020-03-26T00:02:42+5:302020-03-26T00:38:45+5:30
कोरोना व्हायरसने जागतिक महास्ता म्हणवून घेणाऱ्या अमेरिकेचीही कंबर तोडली आहे. तेथे मृतांचा आकडा 770वर जाऊन पोहोचला आहे. इटली, स्पेनसारखे विकसित देशही कोरोनापुढे हतबल झाले आहेत. मात्र, रशियात आतापर्यंत कोरोनामुळे केवळ एकाचाच मृत्यू झाल्याचे समजते.
नवी दिल्ली - कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. मोठ-मोठे देशही या व्हायरसपुढे हतबल होताना दिसत आहेत. यातच आज (बुधवारी) सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्यात फोनवर चर्चा झाली. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये झालेली ही चर्चा अत्यंत महत्वाची मानली जात आहे.
कोरोना व्हायरसने जागतिक महास्ता म्हणवून घेणाऱ्या अमेरिकेचीही कंबर तोडली आहे. तेथे मृतांचा आकडा 770वर जाऊन पोहोचला आहे. इटली, स्पेनसारखे विकसित देशही कोरोनापुढे हतबल झाले आहेत. मात्र, रशियात आतापर्यंत कोरोनामुळे केवळ एकाचाच मृत्यू झाल्याचे समजते. रशिया या व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी झाला आहे. यासंदर्भातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्याशी चर्चा केली.
या दोन्ही नेत्यांमध्ये कोरोनाच्या सध्यस्थितीवर चर्चा झाली. यावेळी पंतप्रधानांनी रशियातील भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात रशियन अधिकाऱ्यांनी केलेल्या सहकार्याची प्रशंसा केली. तसेच असेच सहकार्य यापुढेही मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच यावेळी राष्ट्रपती पुतीन यांनीही भविष्यात अशाच प्रकारे सहकार्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनीही पुतीन यांना भारतात अडकलेले सर्व रशियन नागरिक सुखरूप परततील, त्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले आहे.
कोरोनाबरोबरच्या लढाईत सहकार्यावर सहमती -
राष्ट्रपती पुतीन यांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी भारतात करण्यात येत असलेल्या उपाय योजनांबद्दल पंतप्रधान मोदींची प्रशंसा केली. यावेळी या जागतीक संकटाचा सामना करण्यासाठी परस्पर सहकार्य करण्यावरही या दोन्ही नेत्यांत सहमती झाली. रशियातील भारतीय नागरिक आणि भारतातील रशियन नागरिकांच्या सुरक्षेसंदर्भात उचलण्यात येत असलेल्या पावलांसंदर्भातही मोदी आणि पुतीन यांनी एकमेकांचे आभार मानले.
देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून देशातील मृतांच्या संख्येतही वाढ होत आहे. आतापर्यंत देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 13वर पोहोचली आहे. तर भारतात आतापर्यंत 600 हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. रशियातही 650 हून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून तेथे आतापर्यंत एकाचाच कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समजते.