नरेंद्र मोदींनी आचरणात आणली लोकांची ही सूचना
By Admin | Published: July 17, 2017 06:03 PM2017-07-17T18:03:02+5:302017-07-17T18:03:02+5:30
एखादा नेता कोणत्याही समारंभ अथवा कार्यक्रमाला गेल्यास पुष्पगुच्छ देऊन त्याचं स्वागत करण्याचा शिष्टाचार आहे
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 17 - एखादा नेता कोणत्याही समारंभ अथवा कार्यक्रमाला गेल्यास पुष्पगुच्छ देऊन त्याचं स्वागत करण्याचा शिष्टाचार आहे. मात्र लवकरच हा शिष्टाचार इतिहासजमा होणार आहे. कारणंही तसंच आहे, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशांतर्गत दौ-यावेळी पुष्पगुच्छ देऊ नका, असे निर्देश केंद्रीय गृहमंत्रालयानं सर्व राज्यांना दिले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदींच्या अॅपचं लाँचिंग करण्यात आलं, त्या अॅपवर मोदींनी पुष्पगुच्छ स्वीकारू नये, अशा आशयाच्या सूचना लोकांकडून प्राप्त झाल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 15 ऑगस्ट 2016ला देशाला संबोधित केलं होतं. त्यापार्श्वभूमीवर सूचना मागवण्यात आल्या होत्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्ही लोकांकडून पुष्पगुच्छ का स्वीकारता ? तुम्ही आणि बाकीचे मंत्री पुष्पगुच्छ स्वीकारणं बंद करू शकत नाहीत का ? फक्त तुम्ही जरी असं केलंत तर दीड कोटी रुपये वाचतील, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींना आशिष आनंद यानं दिला होता.
पंतप्रधान मोदी 9 ऑगस्ट 2016ला मध्य प्रदेशमध्ये गेले होते तेव्हा त्यांना 10 ते 15 पुष्पगुच्छ देण्यात आले. ते स्वीकारल्यानंतर मोदींनी लगेच पुष्पगुच्छ आपल्या सुरक्षारक्षकांकडे सोपवले. "त्या फुलांचा सुगंध घेता येईल, त्याआधीच दुसरा पुष्पगुच्छ तुमच्या हातात होता. तुम्ही रोज हजारो लोकांना भेटता, जे तुमच्या स्वागतासाठी पुष्पगुच्छ देतात", असं आशिष आनंद यांनी लिहिलं होतं.
"पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वर्षातील 300 दिवसांत रोज 10 लोकांची भेट घेतली तर किमान 10 ते 15 पुष्पगुच्छ ते स्वीकारतील. एका पुष्पगुच्छाची किंमत 500 रुपये धरली तर वर्षाला 1.5 कोटी रुपये खर्च होतात", असंही आशिष आनंद यांनी लिहिलं होतं. "पुष्पगुच्छ स्वीकारण्यापेक्षा त्याचे पैसे जमा केल्यास तो पैसा विकासकामात वापरू शकतो", असं आशिष आनंद यांचं म्हणणं होतं.
At best will be a flower among with a khadi handkerchief or a book may be presented to welcome the dignitary: MHA to all states
— ANI (@ANI_news) July 17, 2017
आणखी वाचा
(पुष्पगुच्छांऐवजी भेट म्हणून पुस्तके द्यावीत!)
(पुष्पगुच्छ स्वीकारले नाहीत तर करोडो वाचतील, पंतप्रधान मोदींना सल्ला)
गेल्या काही दिवसांपूर्वी पी. एन. पणिकर फाऊंडेशनच्या ‘वाचन महिना’ कार्यक्रमाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. मोदी म्हणाले, ‘‘चांगल्या ज्ञानाचा पाया असल्यास त्यातून चांगल्या समाजाची दर्जेदार बांधणी होईल.’’ डिजिटल साक्षरतेवर भर देऊन मोदी म्हणाले की, ‘‘फाऊंडेशनने आता डिजिटल साक्षरतेवर भर दिला त्याबद्दल मला आनंद वाटतो. आज ही गरज आहे. अशा बांधिलकीने होत असलेल्या सामाजिक चळवळी मला मोठ्या आशा वाटतात. या अशा कामातून मोठे बदल घडतील.’’ तरुण पिढीने वाचनाची शपथ घ्यावी आणि इतरांनाही त्यासाठी प्रोत्साहन द्यावे. चांगले वाचणारी पिढी भारताच्या विकासात हातभार लावील, असेही मोदी म्हणाले. वाचनासारखा दुसरा मोठा आनंद नाही आणि ज्ञानापेक्षा मोठा मित्र नाही, असे त्यांनी म्हटले. शुभेच्छा देताना लोकांनी पुष्पगुच्छांऐवजी पुस्तके द्यावीत, असे आवाहन त्यांनी केले. साक्षरता आणि शिक्षणात केरळच्या कामगिरीचे कौतूक करताना मोदी म्हणाले की,‘‘ देशासाठी केरळ हे या दोन्ही क्षेत्रांत मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान बनले आहे.’’ 100 टक्के साक्षर बनणारे केरळ हे देशातील पहिले राज्य आहे.