Narendra Modi : लॉकडाऊन टाळायचाच प्रयत्न करा, तो शेवटचा पर्याय असू दे; पंतप्रधानांची राज्य सरकारांना स्पष्ट सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 09:18 PM2021-04-20T21:18:08+5:302021-04-20T21:41:19+5:30
Narendra Modi: आजच्या स्थितीत आपल्याला लॉकडाऊनपासून दूर रहायचं आहे. लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असावा, लॉकडाऊन पासून दूर राहण्याचा प्रयत्न राज्य सरकारने करावा, असे आवाहन मोदींनी केलंय.
नवी दिल्ली - देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आज केंद्रीय गृह सचिव अजय कुमार भल्ला, नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल आणि आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी मंगळवारी उच्चस्तरीय बैठक घेतली. यात सर्व केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव सहभागी झाले होते. त्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील जनतेशी संवाद साधत कोरोनाच्या परिस्थितीचं कथन केलं. तसेच, लॉकडाऊन हा अंतिम पर्याय असल्याचेही त्यांनी सांगितलं.
कोरोनाविरोधातील लढाईत पुढील तीन आठवडे अत्यंत निर्णायक असतील, तसेच यादरम्यान प्रत्येकालाच अत्यंत सावध रहावे लागेल, असे केंद्रीय पथकाचे डॉ. व्हीके पॉल यांनी म्हटले आहे. (The next three weeks are crucial, all states should be vigilant says Central Government government ). तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आपल्या भाषणात कोरोनाबद्दलची परिस्थिती सांगत आपण कोरोनाविरुद्धच्या लढाईत धैर्यानं सामना करत असल्याच म्हटलं. तसेच, देशाने जगभरातील लसीकरणामध्ये स्वत:ला सिद्ध केल्याचंही मोदींनी सांगितलं.
कोरोनाविरुद्ध देश पुन्हा एकदा मोठी लढाई लढत आहे. दुसऱ्या लाटेमुळे नागरिकांना होत असलेले दुःख मला समजू शकते. कोरोनामुळे प्राण गमावलेल्या नातेवाईकांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. कितीही कठीण परिस्थिती आली, तरी धैर्य, संयम गमावता कामा नये, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी देशवासीयांना केलंय. तसेच, देशातील डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, अॅम्बुलन्स चालक, पोलीस कर्मचारी या कोरोना योद्धांचे कौतुक केले. तसेच, कोरोनाच्या लढाईला धैर्याने तोंड दिले, तरच आपण त्यात विजय मिळवू शकतो, असेही मोदी म्हणाले. यापुढे देशाला लॉकडाऊन परवडणारा नसल्याचे सांगताना, लॉकडाऊन हा अंतिम पर्याय असल्याचंही मोदींनी म्हटलं.
राज्य सरकारला माझा आग्रह आहे की, कामगारांना विश्वासात घ्यायला हवा. कामगार सध्या ज्या शहरात आहेत, तेथेच राहावे, असे सांगण्यात यावे. कामगार आणि शेतकऱ्यांचं प्राधान्यक्रमाने लसीकरण करण्यात येणार आहे. सध्या, आपण कोरोना महामारीला लढा देतोय, पहिल्या लाटेवेळी आपल्याकडं अनेक साधनसामुग्रींचा अभाव होता. आता, परिस्थिती वेगळी आहे. जनतेच्या सहभागातूनच आपण कोरोनाला पराभूत करू शकतो, असे मोदींनी म्हटले.
आज की स्थिति में हमें देश को लॉकडाउन से बचाना है। मैं राज्यों से भी अनुरोध करूंगा कि वो लॉकडाउन को अंतिम विकल्प के रूप में ही इस्तेमाल करें। लॉकडाउन से बचने की भरपूर कोशिश करनी है।माइक्रो कन्टेनमेंट जोन पर ही ध्यान केंद्रित करना है: PM मोदी pic.twitter.com/9YUPacz6WR
— ANI_HindiNews (@AHindinews) April 20, 2021
लहान मित्रांना माझी विनंती आहे, घरातील लोकांना घराबाहेर पडू देऊ नका. प्रसार माध्यमांनीही लोकांना कोरोना निमयावलींचे पालन करण्याचे आवाहन करावे. आजच्या स्थितीत आपल्याला लॉकडाऊनपासून दूर रहायचं आहे. लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असावा, लॉकडाऊन पासून दूर राहण्याचा प्रयत्न राज्य सरकारने करावा, असे आवाहन मोदींनी केलंय. नवरात्रीचा आज शेवटचा दिवस आहे. उद्या रामनवमी आहे. त्यामुळे, मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांना नमन करुन आपण कोरोनाच्या नियमावलींची मर्यादा पाळायला हवी, असेही मोदींनी म्हटले. रमजानच्या पवित्र महिन्याचाही आज सातवा दिवस आहे. रमजानही आपल्याला धैर्य आणि निममाचं पालन करण्याची शिकवण देते. आजची परिस्थिती बदलण्यास देश अजिबात कमी पडणार नाही, असेही मोदींनी म्हटले.
देशातील प्रत्येक गरजूला ऑक्सिजन मिळायला हवा, लसीकरणासाठीही आपण महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, आता 1 मे पासून 18 वर्षांपासूनच्या सर्व नागरिकांना लस टोचण्यात येणार आहे. त्यामुळे, कामगार आणि शेतकरी वर्गाचं प्राधान्यानं लसीकरण होईल. लसीकरणाची गतीही वाढविण्याचा आपला प्रयत्न आहे.
लस तयार करणाऱ्या कंपन्यांशी बैठक
देशात कोरोनाचा कहर वाढत असतानाच, आज मंगळवारी सायंकाळी 6 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने लस तयार करणाऱ्या कंपन्यांशी बैठक घेतली. यापूर्वी सोमवारी त्यांनी फार्मास्युटिकल इंडस्ट्रीतील प्रमुखांशी चर्चा केली होती. तसेच, पंतप्रधानांनी कोरोनाविरोधातील लढाईत औषध क्षेत्राच्या महत्वपूर्ण भूमिकेचेही कौतुकही केले.
भारत बनला फार्मेसी ऑफ वर्ल्ड - मोदी
मोदी म्हणाले, औषध उद्योगाच्या प्रयत्नांमुळेच, आज भारताला जगात फार्मेसी ऑफ वर्ल्ड म्हणून ओळखले जाते. आपण या महामारीच्या काळात जगातील 150 हून अधिक देशांना आवश्यक औषधी उपलब्ध करून दिली.
देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,59,170 नवे रुग्ण -
गेल्या काही दिवसांपासून देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. देशातील रुग्णसंख्येने उच्चांक गाठला आहे. मंगळवारी (20 एप्रिल) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 24 तासांत कोरोनाचे 2,59,170 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 1,761 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1,53,21,089 पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 1,80,530 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 20,31,977 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 1,31,08,582 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.