चाचेगिरी आणि दहशतवादासाठी समुद्री मार्गांचा दुरुपयोग, नरेंद्र मोदींनी UNSC मध्ये मांडली 5 तत्वे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2021 06:47 PM2021-08-09T18:47:22+5:302021-08-09T19:09:44+5:30
Nnarendra Modi in UNSC: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'समुद्री सुरक्षेला चालना: आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज' विषयावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या हायलेव्हल ओपन डिबेटमध्ये भाष्य केलं.
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) सागरी सुरक्षेवरील खुल्या चर्चेच्या अध्यक्षस्थानी आहेत. ही बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होत असून, यात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्य देशांचे पंतप्रधान किंवा राष्ट्रपती, यूनाइटेड नेशंस सिस्टम उच्च आण आणि प्रमुख प्रादेशिक संघटनाचे प्रमुख उपस्थित आहेत. हा कार्यक्रम UNSC च्या वेबसाईटवर लाइव्ह स्वरुपात सुरू आहे.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'समुद्री सुरक्षेला चालना: आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज' विषयावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदे (UNSC) च्या हायलेव्हल ओपन डिबेटमध्ये भाष्य केलंय. यावेळी ते म्हणाले की, 'समुद्र हा आपला वारसा आहे. समुद्री मार्ग आंतरराष्ट्रीय व्यापाराची लाइफ लाइन आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे, समुद्र आपल्या पृथ्वीसाठी सर्वात महत्वाचा आहे. पण, आज आपल्या या समुद्राला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे.'
चाचेगिरी आणि दहशतवादासाठी दुरुपयोग
मोदी पुढे म्हणाले की, 'आज चाचेगिरी आणि दहशतवादासाठी समुद्री मार्गांचा दुरुपयोग होत आहे. अनेक देशांमध्ये समुद्री सीमेवरुन वाद सुरू आहे, तर हवामान बदलामुळेही या समुद्रावर मोठा परिणाम पडत आहे. मी तुमच्यासमोर पाच मूलभूत तत्त्वे मांडू इच्छितो.
1: आपण वैध सागरी व्यापारामधील अडथळे दूर केले पाहिजेत. आपल्या सर्वांची समृद्धी सागरी व्यापाराच्या सक्रिय प्रवाहावर अवलंबून आहे. यामधील अडथळे संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेसाठी आव्हान ठरू शकतात.
2: सागरी वाद शांततेने आणि आंतरराष्ट्रीय कायद्याच्या आधारावर सोडवायला हवे. परस्पर विश्वास आणि धैर्यासाठी हे आवश्यक आहे. जागतिक शांतता आणि स्थिरता सुनिश्चित करण्याचा हा एकमेव मार्ग आहे.
3: आपण नैसर्गिक आपत्ती आणि समुद्री धोक्यांना सामोरे जायला हवं. भारताने या विषयावर प्रादेशिक सहकार्य वाढवण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. आम्ही अनेकदा चक्रीवादळ, त्सुनामी आणि प्रदूषणाशी संबंधित सागरी आपत्तींचा सामना केला आहे.
4: सागरी पर्यावरण आणि सागरी संसाधने जपायची आहेत. आपल्याला माहीत आहे की, महासागराचा वातावरणावर थेट परिणाम होतो आणि म्हणूनच आपल्याला आपले सागरी पर्यावरण प्लास्टिक आणि तेल गळतीसारख्या प्रदूषणापासून मुक्त ठेवायचे आहे.
5: आपण जबाबदार सागरी कनेक्टिव्हिटीला प्रोत्साहन दिले पाहिजे. सागरी व्यापार वाढवण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे, परंतु अशा पायाभूत प्रकल्पांच्या विकासासाठी देशांची वित्तीय स्थिरता आणि शोषण क्षमता विचारात घ्यावी लागेल.
भारताला मिळाले UNSC चे अध्यक्षपद
UNSC यूनायटेड नेशंसच्या 6 प्रमुख अंगांपैकी एक आहे. यावर जगभर शांती आणि सुरक्षा कायम ठेवण्याची जबाबदारी आहे. भारताला स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षी जगातील या सर्वात शक्तीशाली संस्थेचे अध्यक्षपद मिळाले आहे. 75 वर्षात पहिल्यांदाच भारतीय पंतप्रधान UNSC च्या अध्यक्षपदी विराजमान आहेत.