नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना नाही तर परदेशांना भेटी देतात -राहुल गांधी
By admin | Published: May 18, 2015 11:48 PM2015-05-18T23:48:23+5:302015-05-18T23:48:23+5:30
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. नरेंद्र मोदी संपूर्ण जग फिरत आहेत.
अमेठी : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. नरेंद्र मोदी संपूर्ण जग फिरत आहेत. वेगवेगळ्या देशांचे दौरे करीत आहेत. पण शेतकऱ्यांना भेटायला, त्यांच्या घरी यायला त्यांना वेळ नाही, असे राहुल म्हणाले. मोदी सरकार ‘बदल्याचे राजकारण’ करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
राहुल गांधी सोमवारी अमेठी या आपल्या मतदारसंघाच्या तीनदिवसीय दौऱ्यावर पोहोचले. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी जगदीशपूर येथे अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना ते भेटले. यानंतर सुमारे दोन किमीची वाट पायी तुडवत, फूड पार्क उभा राहणार होता, त्याठिकाणी पोहोचले. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली.
प्रस्तावित मेगा फूड पार्क प्रकल्प रद्द करणे हे सूडाचे राजकारण असून अमेठीतील शेतकऱ्यांवरील अन्याय आहे. हा फूड पार्क रद्द झाल्याने अमेठी व सुमारे १० जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
मोदी सरकारला माझ्यावर सूड उगवायचा आहे. पण यात निष्पाप शेतकरी व मजूर नाहक भरडले जात आहेत, असे राहुल गांधी यावेळी म्हणाले.
पंतप्रधान चीन, जपान, मंगोलियासह संपूर्ण जगात फिरत आहेत. पण संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या घरी यायला त्यांना वेळ नाही. पंजाब, तेलंगण, महाराष्ट्र, हरियाणा अशा प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांचा आवाज, त्यांच्या मागण्या दडपल्या जात आहे. पण काँग्रेस हा आवाज कदापि दडपू देणार नाही, असेही राहुल म्हणाले. (वृत्तसंस्था)
गतवर्षी लोकसभा निवडणुकीदरम्यान अमेठीतून राहुल यांच्याविरोधात निवडणूक लढणाऱ्या विद्यमान केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी गत आठवड्यात अमेठीचा दौरा केला होता. फूड पार्कच्या मुद्यावर राहुल गांधी अमेठीवासीयांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. या आरोपाला राहुल यांनी या दौऱ्यात सणसणीत उत्तर दिले.
वर्षभरातील कामगिरीला १० पैकी शून्य गुण
४मोदी सरकारच्या गत वर्षभरातील कामगिरीला किती गुण द्याल, असा प्रश्न काही पत्रकारांनी राहुल यांना केला. यावर मी १० पैकी शून्य गुण देईल. मोदी सरकार केवळ उद्योगपतींचे सरकार आहे. त्यामुळे मोदींचे उद्योगपती मित्र मात्र त्यांना नक्कीच १० पैकी १० गुण देतील, असे उत्तर राहुल यांनी दिले. शेतकरी आणि कामगारांचे प्रश्न हाताळण्यात हे सरकार पूर्णत: अपयशी ठरल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.
टीका बालिशपणाची- जितेंद्र सिंह
४राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या विदेश दौऱ्यावर केलेली टीका म्हणजे निव्वळ बालिशपणा आहे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली. राष्ट्रीय कर्तव्याचा भाग म्हणून विदेश दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यात त्यांचे होत असलेले अभूतपूर्व स्वागत आपल्यापैकी सर्वांची छाती अभिमानाने फुलून यावी असे आहे.
अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
कोट
पाच वर्षे कुंभकर्णासारख्या घोर निद्रेत राहिल्याने राहुल यांची होमवर्क करण्याची सवय सुटली आहे. फूड पार्कच्या मुद्यावर ते जनतेची दिशाभूल करीत आहेत.
-अनुराग ठाकूर, भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष