मुस्लीम टोपी नको म्हणणारे नरेंद्र मोदी आता थेट मशिदीला देणार भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2017 10:49 AM2017-09-13T10:49:35+5:302017-09-13T10:49:35+5:30
गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांचे मुस्लिमप्रेम किती बेगडी होते याचा साक्षात अनुभव सद्भावना सर्वांनी अनुभवली होती. पण आता पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी पहिल्यांदाच अहमदाबादमधील प्रसिद्ध सिदी सय्यद मशिदीला भेट देणार आहेत
अहमदाबाद, दि. 12 - गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी मुस्लिम टोपी घालण्यास नकार दिला होता. गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांचे मुस्लिमप्रेम किती बेगडी होते याचा साक्षात अनुभव सद्भावना सर्वांनी अनुभवली होती. पण आता पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी पहिल्यांदाच अहमदाबादमधील प्रसिद्ध सिदी सय्यद मशिदीला भेट देणार आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर हा चर्चेचा विषय सुरु आहे.
उद्या जपानचे पंतप्रधान शिंजो आबे भारत दौऱ्यावर येणार असून त्यांना ही मशीद पाहायचीय. त्यावेळी त्यांचे गाईड म्हणून मोदी त्यांच्यासोबत जाणार असल्याचं माध्यमांत वृत्त आहे. त्यासाठीची तयारी मोदींनी सुरू केली आहे. 14 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी व जपानचे पंतप्रधान आबे शिंजो यांच्या हस्ते साबरमतीजवळ मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा पायाभरणी समारंभ होणार आहे. 13 सप्टेंबरला मोदी यांचा अहमदाबादमध्ये रोड शो आयोजित कऱण्यात आला आहे. अहमदाबाद विमानतळ ते साबरमती आश्रम असा रोड शो ते मोदींसोबत करणार आहेत. त्यानंतर ते मशिदीला भेट देणार असून मोदी-आबे यांचं खास फोटोसेशन केलं जाणार आहे. सूर्यास्ताच्या वेळी हा परिसर वेगळ्याच तेजाने झळाळतो. ते क्षण कॅमेऱ्यात टिपले जाणार आहेत.
16 व्या शतकात बांधल्या गेलेल्या सिदी सय्यद मशिदीला अलीकडेच 'जागतिक वारसा' म्हणून गौरवण्यात आले आहे. त्यासाठी युनेस्कोचे संचालक जनरल इरिना बोकोवा नुकतेच येऊन गेले. त्यांनी मुख्यमंत्री विजय रुपानी यांना भेटून युनेस्कोचं प्रमाणपत्रही दिलं. त्यानंतर पुन्हा ही मशीद चर्चेत आली आहे.
नरेंद्र मोदी पहिल्यांदाच सिदी सय्यद मशीद बघण्यासाठी येणार आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त मुकेश कुमार यांनी दिली. त्याला सुन्नी वक्फ कमिटीचे अध्यक्ष रिजवान कादरी यांनी दुजोरा दिला. ही मशीद म्हणजे संस्कृती आणि सौंदर्याचा मिलाफ आहे. या मशिदीचा इतिहास आणि महत्त्व शिंजो आबे यांना पंतप्रधान मोदी स्वतः सांगणार आहेत. त्यासाठी पंतप्रधान कार्यालयानं या मशिदीबद्दलची उपलब्ध असलेली सर्व माहिती मागवल्याचं त्यांनी सांगितलं.
'मुस्लिम टोपी'स मोदींनी दिला होता नकार
2011 मध्ये मुस्लिम धर्मगुरू सय्यद इमाम शाही सैय्यद यांनी उपोषणस्थळी जाऊन मोदींना खास मुस्लिम टोपी भेट दिली. परंतु मोदींनी मुस्लिम टोपी घालण्यास साफ नकार दिला होता. अहमदाबाद शहराजवळील पिराना गावातील दर्ग्यामध्ये मौलवी असलेल्या सय्यद इमाम यांनी या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. मुस्लिम टोपी घालण्यास नकार देऊन मोदींनी केवळ आपलाच नव्हे, तर संपूर्ण मुस्लिम धर्माचा अवमान केला आहे, असा भडिमार त्यांनी व्यक्त केला होता. गुजरात विद्यापीठाच्या पदवीदान हॉलमध्ये उपोषणाला बसलेल्या मोदींना भेटायला मी गेलो होतो. मोदींच्या सद्भावना उपोषणाबद्दल ऐकले आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी मी व्यासपीठावर गेलो. प्रेमाखातर मुस्लिमांची खास टोपी त्यांना देऊ केली. परंतु मुस्लिम टोपी मी घालणार नाही, असे त्यांनी मला सांगितले. मुस्लिम टोपी घातल्याने त्यांच्या प्रतिमेला धक्का लागू शकतो, अशी भीती त्यांना वाटत असावी, अशी टीका इमाम यांनी केली होती.