पाकिस्तान दौरा करणारे नरेंद्र मोदी भारताचे चौथे पंतप्रधान
By admin | Published: December 25, 2015 05:55 PM2015-12-25T17:55:48+5:302015-12-25T18:05:45+5:30
नरेंद्र मोदींच्या आधी त्यांच्याच पक्षाचे अटलबिहारी वाजपेयी पाकिस्तान दौ-यावर जाणारे शेवटचे पंतप्रधान होते. अकरावर्षापूर्वी वाजपेयी पाकिस्तान दौ-यावर गेले होते.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २५ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सकाळी टि्वटरवरुन पाकिस्तान भेटीचा कार्यक्रम जाहीर करुन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. मोदींच्या आधी त्यांच्याच पक्षाचे अटलबिहारी वाजपेयी पाकिस्तान दौ-यावर जाणारे शेवटचे भारतीय पंतप्रधान होते. अकरावर्षापूर्वी वाजपेयी पाकिस्तान दौ-यावर गेले होते.
त्यानंतर आज मोदींनी पाकिस्तानला धावती भेट दिली. योगायोग म्हणजे अटलबिहारी वाजपेयी यांचा आज ९१ वा वाढदिवस आहे आणि आजच नवाझ शरीफ यांचाही वाढदिवस आहे. वाजपेयी २००४ साली १२ व्या शिखर परिषदेसाठी इस्लामाबादला गेले होते. वाजपेयी यांच्यानंतर पंतप्रधान बनलेले मनमोहन सिंग पाकिस्तान दौ-यावर जातील अशी शक्यता होती. मात्र २००८ साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांनी त्यांच्या कार्यकाळात पाकिस्तान दौरा केला नाही.
भारताला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले त्यानंतर सहावर्षांनी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी १९५३ साली पाकिस्तान दौरा केला. सप्टेंबर १९६० मध्ये नेहरु एक करार करण्यासाठी पुन्हा पाकिस्तान दौ-यावर गेले होते. त्यानंतर नेहरु यांचे नातू दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी दोनवेळा पाकिस्तान दौ-यावर गेले.
नेहरु यांच्यानंतर २८ वर्षांनी राजीव गांधी यांनी डिसेंबर १९८८ आणि जुलै १९८९ मध्ये पाकिस्तान दौरा केला. राजीव गांधी यांनी त्यांच्या पाकिस्तान दौ-यामध्ये पाकिस्तानच्या दिवंगत पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्याबरोबर परस्परांच्या अणूऊर्जा प्रकल्पांवर हल्ला न करण्याचा महत्वपूर्ण करार केला होता.