नरेंद्र मोदी १४ सप्टेंबरला जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर, निवडणूक रॅलींना संबोधित करणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2024 02:23 PM2024-09-08T14:23:48+5:302024-09-08T14:30:58+5:30
J-K Assembly Elections 2024 : जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे.
J-K Assembly Elections 2024 :जम्मू-काश्मीरमध्ये तब्बल दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तारखा घोषित झाल्यापासून सर्वच राजकीय पक्षांनी आपापली तयारी केली आहे. सर्वच राजकीय पक्ष आपापल्या तयारीत व्यस्त असून उमेदवारांची घोषणाही करत आहेत. जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे.
काँग्रेसपाठोपाठ आता भाजपनेही आपल्या बड्या नेत्यांना येथे निवडणूक प्रचारात उतरवण्याची योजना आखली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जम्मू-काश्मीरमधील निवडणुकीत प्रचार करण्याची तयारी दर्शवली आहे. १४ सप्टेंबरपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू-काश्मीरमध्ये विविध निवडणूक रॅलींना संबोधित करणार आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये भाजपच्या प्रमुख रॅलींसह भाजपच्या निवडणूक प्रचाराला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सज्ज झाले आहेत.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी म्हणजेच ६ सप्टेंबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे संकल्पपत्र प्रसिद्ध केले आहे. संकल्पपत्र प्रसिद्ध केल्यानंतर अमित शाह यांनी भाजप नेत्यांची बैठक घेतली. तसेच, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जम्मूमध्ये रॅलीही घेतली. यानंतर दुसऱ्या दिवशी ७ सप्टेंबरला अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना दहशतवाद, पाकिस्तान आणि विरोधी पक्षांवरही जोरदार हल्लाबोल केला.
स्टार प्रचार लवकरच प्रचार सुरू करतील
भाजपने गेल्या महिन्यात जम्मू-काश्मीरसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली होती. यामध्ये ४० नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. या सर्व नेत्यांचा लवकरच जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक प्रचार सुरू होणार आहे. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांसारख्या बड्या नेत्यांचा समावेश आहे. याशिवाय अनेक केंद्रीय मंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपशासित राज्यांच्या काही मुख्यमंत्र्यांचाही या यादीत समावेश आहे. केंद्रीय मंत्र्यांमध्ये मनोहर लाल खट्टर, जी किशन रेड्डी, शिवराज सिंह चौहान आणि डॉ जितेंद्र सिंह अशी नावे आहेत.
काय आहे भाजपच्या संकल्पपत्रात?
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे संकल्पपत्र प्रसिद्ध केले. यामध्ये कलम ३७० कधीही परत लागू होणार नाही, यासह ५ लाख रोजगार, उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना दोन मोफत गॅस सिलिंडर, १०वीच्या विद्यार्थ्यांना टॅब्लेट आणि लॅपटॉप इत्यादी आश्वासने भाजपने जम्मू-काश्मीरच्या जनतेला दिली आहेत. तसेच, पंतप्रधान सन्मान निधीतून १० हजार रुपये राज्यातील शेतकऱ्यांना देण्यात येतील. सध्याच्या ६ हजार रुपयांमध्ये आणखी ४ हजार रुपये जोडण्यात येतील. शेतीच्या कामांसाठी वीजदरांमध्ये ५० टक्के कपात केली जाईल. अटल आवास योजनेंतर्गत भूमिहीन लोकांना ५ मरला म्हणजे सुमारे १,३६१ चौरस फूट जमीन देऊ, अशी आश्वासने भाजपने शेतकऱ्यांना दिली आहेत.
मतदान कधी होणार आहे?
जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी १८ सप्टेंबर, २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. त्याचबरोबर, विधानसभा निवडणुकीचे निकाल निवडणूक आयोगाकडून ४ ऑक्टोबरला जाहीर केले जाणार आहेत.