नरेंद्र माेदींचा राष्ट्रवादीवर हल्लाबाेल; ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार, कुटुंबकेंद्रित पक्षांवर जोरदार टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 07:23 AM2023-06-28T07:23:14+5:302023-06-28T07:32:23+5:30
Narendra Modi: तुम्हाला तुमच्या मुला-मुलींचे आणि नातवंडांचे कल्याण करायचे असेल, तर भाजपला मत द्या, कोणत्याही कुटुंबाभिमुख पक्षांना नाही, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी राष्ट्रवादीसह विरोधी पक्षांवर हल्लाबोल केला.
भोपाळ - राष्ट्रवादी काँग्रेसवर ७० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप आहे. तुम्हाला शरद पवार यांच्या मुलीचे कल्याण करायचे असेल तर राष्ट्रवादीला मतदान करा. तुम्हाला तुमच्या मुला-मुलींचे आणि नातवंडांचे कल्याण करायचे असेल, तर भाजपला मत द्या, कोणत्याही कुटुंबाभिमुख पक्षांना नाही, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी राष्ट्रवादीसह विरोधी पक्षांवर हल्लाबोल केला.
मध्य प्रदेशातील भोपाळ येथे पक्षाच्या ‘मेरा बूथ सबसे मजबूत’ मोहिमेंतर्गत आयोजित कार्यक्रमात ते भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. मेळाव्याला संबोधित करताना पंतप्रधानांनी विरोधी पक्षांवर जोरदार टीका केला. मोदी म्हणाले की, असे कोणतेही क्षेत्र नाही जे काँग्रेसच्या घोटाळ्यांचे शिकार झाले नाही.
मोदी म्हणाले की, एकेकाळी एकमेकांचे कडवे विरोधक असलेले विरोधी पक्ष आता एकत्र आले आहेत. जे भाजपविरोधात एकत्र येत आहेत त्यांच्याबद्दल आपल्या मनात राग नसून सहानुभूतीची भावना असली पाहिजे. पाटण्यातील विरोधकांची बैठक म्हणजे फोटोसेशन असल्याची खिल्ली पंतप्रधान मोदी यांनी उडविली. पाटण्यातील विरोधकांच्या एकजुटीचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की, बैठकीत सहभागी झालेल्या पक्षांचा इतिहास पाहिल्यास, त्या फोटोत दिसणारे सर्व २० लाख कोटी रुपयांच्या घोटाळ्यांची हमी आहेत.
एकट्या काँग्रेसचे लाखो कोटींचे घोटाळे आहेत. २जी, कॉमनवेल्थ आणि इतर घोटाळ्यांचा यावेळी त्यांनी उल्लेख केला. इतर अनेक घोटाळ्यांचा उल्लेख करताना पंतप्रधानांनी राष्ट्रीय जनता दल, द्रमुक, टीएमसी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नावदेखील घेतले. विरोधी पक्ष घोटाळ्यांची हमी आहे हे जनतेला सांगणे ही भाजप कार्यकर्त्यांची मोठी जबाबदारी आहे, असेही ते म्हणाले.
...तर त्यांना मतदान करा
गांधी घराण्याचा विकास हवा असेल तर काँग्रेसला मतदान करा. मुलायमसिंह यादव यांच्या मुलाचे कल्याण करायचे असेल तर समाजवादी पक्षाला मतदान करा. तुम्हाला लालू प्रसाद यादव यांच्या मुला-मुलींचे कल्याण करायचे असेल तर राजदला मतदान करा. अब्दुल्ला कुटुंबाचे कल्याण करायचे असेल तर नॅशनल कॉन्फरन्सला मतदान करा. तुम्हाला करुणानिधी कुटुंबाचे कल्याण करायचे असेल तर द्रमुकला मतदान करा. के. चंद्रशेखर राव यांच्या मुलीचे कल्याण करायचे असेल तर बीआरएसला मतदान करा; पण तुमच्या मुला-मुलींचे आणि नातवंडांचे कल्याण करायचे असेल तर भाजपला मतदान करा.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान
पंतप्रधानांनी केलेले आरोप तथ्यहीन
शिखर बँकेचा मी कधीही साधा सभासदसुद्धा नव्हतो. त्यामुळे त्या बँकेकडून मी कर्ज घेण्याचा प्रश्नच येत नाही. पंतप्रधान मोदी यांनी याबाबत केलेले आरोप तथ्यहीन आहेत, त्यांनी आपल्या बोलण्याचा विचार करावा. खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरचे आरोपही निराधार आहेत. विरोधी पक्षांचे नेते एकत्र येतात, देशाच्या समस्येबाबत काही विचार करतात हेच काही राजकीय लोकांना पटत नाही. त्यातूनच जाणीवपूर्वक अशी दिशाभूल करणारी विधाने केली जाता.
- शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
समान नागरी कायद्याचे समर्थन
- पंतप्रधान मोदी यांनी समान नागरी कायद्याचे पुन्हा एकदा समर्थन केले. सुप्रीम कोर्टानेदेखील समान नागरी कायद्याचे समर्थन केले आहे; परंतु मतपेढीचे राजकारण करणारे त्याला विरोध करत आहेत. देशात दोन व्यवस्था कशा असू शकतात, असा सवालही त्यांनी केला.
- भाजपने तुष्टीकरणाचा आणि मतपेढीच्या राजकारणाचा मार्ग न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे, असे मोदींनी ठासून सांगितले. मुस्लीम समुदायाची दिशाभूल करण्यासाठी आणि चिथावणी देण्यासाठी विरोधक समान नागरी कायद्याशी संबंधित मुद्द्यांचा वापर करत आहेत.