नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला येणार शेजारी राष्ट्रांचे प्रमुख
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 04:28 AM2019-05-29T04:28:29+5:302019-05-29T04:28:45+5:30
श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, भूतान, थायलंड, म्यानमार या शेजारी राष्ट्रांच्या प्रमुखांना देण्यात आले असले तरी पाकच्या पंतप्रधानांना बोलावण्यात आलेले नाही
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या ३0 मे रोजी होणाऱ्या शपथविधीचे निमंत्रण श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, भूतान, थायलंड, म्यानमार या शेजारी राष्ट्रांच्या प्रमुखांना देण्यात आले असले तरी पाकच्या पंतप्रधानांना बोलावण्यात आलेले नाही. मोदी यांच्या २0१४ च्या शपथविधी सोहळ्याला पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ उपस्थित होते. मालदीव व अफगाणिस्थानलाही गेल्या वेळी निमंत्रण दिले होते.
या वेळी मॉरिशस व किर्गीस्तानच्या राष्ट्रप्रमुखांनाही आमंत्रण दिले आहे. पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांना शपथविधीचे निमंत्रण दिलेले नाही. मात्र कोणाला बोलवावे वा बोलावू नये, हा संबंधित देशाचा अधिकार आहे, एवढेच मत पाकने व्यक्त केले. मालदीव, अफगाणिस्थान यांना निमंत्रण दिले नसले तरी त्यांच्याशी भारताचे चांगलेच संबंध आहेत.
या निमंत्रणानुसार नेपाळचे अध्यक्ष मैत्रीपाला सिरीसेना, नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली, भूतानचे पंतप्रधान लोटाय शेरिंग उपस्थित राहणार आहेत. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना परदेश दौºयावर असल्याने राष्ट्रपती अब्दुल हमीद हजर राहतील. म्यानमारतर्फे आँग सॅन स्यू की उपस्थित राहणार का, हे अद्याप नक्की व्हायचे आहे, कारण त्यांचाही परदेश दौरा ठरलेला आहे. मॉरिशस व किर्गीस्तानचे राष्ट्रप्रमुखही हजर राहतील, असे समजते. शिवाय अनेक देशांच्या दूतावासांतील अधिकारीही समारंभाला हजर राहतील.
शपथविधी समारंभ गुरुवारी संध्याकाळी ७ वाजता राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात होणार आहे. देशातील सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांना निमंत्रणे देण्यात आली आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोहळ्याला उपस्थित राहणार असे कळविले आहे. अनेक राष्ट्रप्रमुख यावेळी येणार असल्याने त्या भागातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.
>उन्हाळ्यामुळे समारंभ संध्याकाळी
भाजपसह विविध पक्षांचे नेते, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री, संभाव्य मंत्र्यांचे नातेवाईक, वरिष्ठ सरकारी अधिकारी असे सुमारे एक हजार लोक या समारंभाला उपस्थित राहतील, या पद्धतीने प्रांगणात व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या दिल्लीत प्रचंड उन्हाळा आहे आणि राष्ट्रपती भवनाच्या हॉलची आसनक्षमता कमी असल्याने शपथविधी समारंभ संध्याकाळी प्रांगणात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.