काळ्या पैशावर अंकुश आणणारच - नरेंद्र मोदी
By admin | Published: September 2, 2016 09:31 PM2016-09-02T21:31:26+5:302016-09-02T22:17:31+5:30
सरकारचं मुल्यांकन केलं जाईल तेव्हा आम्ही सत्तेत येण्याआधी देशातील परिस्थिती काय होती, आधीचं सरकार काय करत होतं या गोष्टीदेखील लक्षात घ्याव्यात असं पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलले आहेत
Next
>- ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 2 - जनताच सरकारचं मुल्यांकन करते. पण जेव्हा मुल्यांकन केलं जाईल तेव्हा आम्ही सत्तेत येण्याआधी देशातील परिस्थिती काय होती, आधीचं सरकार काय करत होतं या गोष्टीदेखील लक्षात घ्याव्यात असं पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलले आहेत. न्यूज 18 ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुलाखत दिली. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या मुद्यांवर मत मांडत चर्चा केली. न्यूज 18 चे समूह संपादक राहुल जोशी यांनी ही मुलाखत घेतली.
भाजपा सरकार जेव्हा सत्तेत आलं तेव्हा लोकांमध्ये निराशा होता. सत्तेत आल्यानंतर सर्वात अगोदर ही निराशा घालवावी यासाठी प्रयत्न केला. विश्वास निर्माण करण्यासाठी कृतीची गरज आहे. दोन वर्षांमध्ये फक्त भारतीयांमध्ये नाही तर जगभरामध्ये विश्वास निर्माण करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आहोत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलले आहेत.
पंतप्रधान मोदींनी यावेळी जीएसटीवर बोलताना जीएसटीमुळे कारभारात पारदर्शकता येईल. जीएसटीमुळे जकातीला मूठमाती मिळेल तसंच जीएसटीमुळे देशाचा महसूल वाढेल. राज्य आणि केंद्रामधील अविश्वासही थांबेल असा दावा केला आहे. कर भरण्याची प्रक्रिया इतकी मोठी आहे की काही लोक त्यामुळे कर भरत नाहीत. जीएसटीमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळेल आणि करप्रणाली सुलभ होईल. करप्रणालीतील बदलांमुळे मोठी क्रांती होईल असंही मोदी बोलले आहेत.
अर्थव्यवस्थेवरुन होत असलेल्या आरोप-प्रत्यारोपांवरही नरेंद्र मोदी बोलले आहेत. सत्तेत आल्यानंत पहिलं बजेट सादर करण्याआधी देशातील आर्थिक परिस्थिती सर्वांसमोर ठेवायला हवी होती असं मला वाटत होतं. राजकारण सांगतं होतं हे सगळं समोर आणलं पाहिजे मात्र राष्ट्रनीती असं करण्यापासून थांबवत होतं. राष्ट्रनीती सांगत होती याचा राजकारणात फायदा होईल मात्र देशाचं नुकसान होईल. राष्ट्रनीतीमुळे मी शांत राहिलो. आमचं राजकीय नुकसान झालं, आमच्यावर टीकाही झाली पण मी शांत राहिलो असं सांगताना मोदींनी काँग्रेस सरकारवर निशाणा साधला.
नरेंद्र मोदींनी काळ्या पैशावर बोलताना पुन्हा एकदा काळ्या पैशावर अंकुश आणणारच असं सांगितलं आहे. कायदा कायद्याचं काम करत आहे. सत्तेत आल्यानंतर मंत्रिमंडळाने सर्वात अगोदर काळ्या पैशासंबंधी निर्णय घेतला होता. काळा पैसा देशाबाहेर जाणार नाही यासाठी आम्हीच नियम तयार केले आहेत. काळ्या पैशांचा खेळ लवकरच संपेल असा दावा मोदींनी केला आहे.
दलितांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांवर बोलताना मोदींनी समाजाप्रती अशा घटना अशोभनीय आहेत असं सांगत निंदा केली. समाजाप्रती अशा घटना अशोभनीय आहेत. कोणत्याही सभ्य समाजाला या घटना शोभा देत नाहीत. मात्र हा राज्याच्या सुरक्षेचा मुद्दा असतो हेदेखील लक्षात ठेवावं. दरवेळी मोदींच्या गळ्यात टाकण्याची गरज नाही. दलित, आदिवासी आणि इतर अत्याचाराच्या घटनांमध्ये गत सरकारच्या तुलनेत कमी झाल्या आहेत.सामाजिक विकृतीचा विनाश करायला हवा. सामाजिक प्रश्नांवर राजकारण करणं चुकीचं आहे सांगताना नेत्यांनी बेजबाबदार वक्तव्य टाळावीत असा सल्ला मोदींनी दिला आहे.
दलितांच्या विकासासाठी आम्ही कटीबद्द, डॉ आंबेडकरांची पंचतीर्थ स्थापली. मात्र विरोधकांना हे पचलं नाही अशी टीका मोदींनी केली आहे.
काश्मीरची समस्या नवी नाही. काश्मीरला विकास आणि विश्वास हवा आहे. काश्मीरमधील तरुण योग्य मार्गाने जाईल असा विश्वास मोदींनी यावेळी व्यक्त केला.
मी आज जे काही आहे त्यामध्ये प्रसारमाध्यमांचा मोठा भाग. माझ्याबद्दलच्या तक्रारींना त्यांना हक्क आहे. टीका झाली नाही तर लोकशाही चालूच शकत नाही. प्रसारमाध्यमांची धावपळ इतकी चालू आहे की रिसर्च न करता बातम्या छापल्या जात आहेत. सरकारमध्ये भीती राहिली पाहिजे तरच काम होईल, देशाचं भलं होईल असं मोदी बोलले आहेत.