देशातील सर्वांत लांब बोगद्याचे नरेंद्र मोदी करणार उद्घाटन
By Admin | Published: March 19, 2017 04:16 PM2017-03-19T16:16:18+5:302017-03-19T17:59:35+5:30
भारतातील सर्वात मोठा बोगदा जम्मू-काश्मीरमध्ये आकाराला येत आहे.
ऑनलाइन लोकमत
चेनानी, दि. 19 - भारतातील सर्वात मोठा बोगदा जम्मू-काश्मीरमध्ये आकाराला येत आहे. जम्मू-काश्मीरमधल्या राष्ट्रीय महामार्गावर कंपनीनं ट्रायल(चाचणी) घेतल्यानंतर तो वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या बोगद्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटन करण्याची शक्यता आहे.
हा भारतातला सर्वात मोठा बोगदा असून, जम्मू-काश्मीरला जोडण्यासाठी याचा खूप मोठा फायदा होणार आहे. या बोगद्यामुळे जम्मूहून काश्मीर अडीच तासांत गाठता येणार आहे. 9 मार्च आणि 15 मार्चला पहिले ट्रायल घेण्यात आले आहे. बर्फवृष्टी आणि हिमस्खलनामुळे वारंवार ठप्प होणा-या राष्ट्रीय महामार्ग 1-अची या बोगद्यामुळे वाहतुकीची समस्या मिटणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव प्रत्येक 75 मीटरवर 124 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून, वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी एक सेंट्रलाइज्ड रूमदेखील तयार करण्यात आली आहे, अशी माहिती प्रकल्प संचालक जे. एस. राठोड यांनी दिली आहे.
बोगद्यामध्ये अनेक टेलिकॉम कंपन्यांचे नेटवर्क आणि मनोरंजनासाठी एफएम सिग्नलही मिळावी, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. 9.2 किलोमीटर खोलवर सुरूंग लावून हा बोगदा बनवण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरच्या जोडणा-या 286 किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्गाचाच हा बोगदा एक भाग आहे. 23 मे 2011ला हिमालयाच्या पर्वतरांगामधून या बोगद्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. या बोगद्यावर जवळपास 3720 कोटी रुपये खर्च आला आहे. या बोगद्यामुळे चेनानी ते नैशारी दरम्यानचं 41 किलोमीटरच अंतर अवघ्या 10.9 किलोमीटरमध्ये कापता येणार आहे.