नरेंद्र मोदी लवकरच इस्रायलला भेट देणार
By admin | Published: March 5, 2016 03:52 AM2016-03-05T03:52:51+5:302016-03-05T03:52:51+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर्षी लवकरच इस्त्राएलला भेट देणार आहेत, अशी माहिती इस्त्राएलचे भारताताली वाणिज्य दूत डेविड अकोव यांनी शुक्रवारी लोकमतला दिली
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर्षी लवकरच इस्त्राएलला भेट देणार आहेत, अशी माहिती इस्त्राएलचे भारताताली वाणिज्य दूत डेविड अकोव यांनी शुक्रवारी लोकमतला दिली. गेल्या वर्षी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी इस्त्राएलला भेट दिली होती आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही त्या देशाच्या दौऱ्यावर गेले होते. त्यामुळे दोन देशांतील संबंध सुधारण्यास मदत होत आहे. नरेंद्र मोदी हे इस्त्राएलला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान असतील. त्यांच्या भेटीबाबत सध्या बोलणी सुरू आहेत.
डेविड ओकोव आणि उपवाणिज्य दूत निमरोद असुलिन यांनी शुक्रवारी लोकमच्या मुंबई कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी बोलताना ओकोव यांनी कृषीपासून सुरक्षेपर्यंत अनेक क्षेत्रांत भारत आणि इस्त्राएल यांच्यात सहकार्य होणे शक्य असून,गेल्या काही वर्षांमध्ये त्या दृष्टीने सकारात्मक पावले पडत असल्याचे नमूद केले. यावेळी त्यांनी भारत-इस्त्राएल संबंध आणि महाराष्ट्र-इस्त्राएल सहकार्य याविषयी सविस्तर चर्चा केली. ते म्हणाले की, तंत्रज्ञानात आमचा देश आघाडीवर असून, उत्पादन क्षेत्रातील कोणत्याही बड्या कंपनीशी विशिष्ट समस्येबाबत तोडगा काढण्यासाठी या तंत्रज्ञानाचा निश्चितच उपयोग होईल. कृषी, वाहननिर्मिती अशा अनेक क्षेत्रात येत्या काही वर्षांत दोन देशांतील कंपन्यांमध्ये आपणास सहकार्य पाहायला मिळू शकेल. भारतासारख्या देशाशी चांगले संबंध असणे इस्त्राएलला आवश्यक वाटत आहे, असे सांगताना त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेतील चांगल्या बदलांचा आणि आर्थिक विकास दराच्या वाढीचा आवर्जून उल्लेख केला.