पत्र लिहिण्यास कारण की...; नरेंद्र मोदींचं इमरान खान यांना उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2019 12:10 PM2019-06-20T12:10:56+5:302019-06-20T12:11:24+5:30
जनतेचा विकास करणे हे भारताचं प्राधान्य आहे. पाकिस्तान वारंवार भारताला चर्चेसाठी आमंत्रित करत आहे
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानी पंतप्रधान इमरान खान आणि परराष्ट्र मंत्री एफ.एम कुरेशी यांच्या अभिनंदन पत्राचं उत्तर दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इमरान खान यांना पत्र लिहून दहशतवादाच्या मुद्द्याचा उल्लेख केला आहे. दोन्ही देशामध्ये अनुकूल वातावरण बनविण्याचा पुनर्विचार व्हायला हवा. मात्र दहशतवादाचा मार्ग सोडल्यानंतरच हे शक्य आहे. असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रात लिहिलं आहे.
नरेंद्र मोदी यांनी इमरान खान यांना पत्र लिहिलं असलं तरी या पत्रात दहशतवाद संपुष्टात आणण्यासाठी दोन्ही देशात चर्चा कधी केली जाणार याचा उल्लेख करण्यात आला नाही. पत्रात नमूद केलं आहे की, भारताला आपल्या शेजारील राष्ट्राशी चांगले संबंध बनविण्याची इच्छा आहे. देशाच्या विकासासाठी शांती स्थिरता गरजेची आहे. जनतेचा विकास करणे हे भारताचं प्राधान्य आहे. पाकिस्तान वारंवार भारताला चर्चेसाठी आमंत्रित करत आहे. मात्र जोवर दहशतवादावर पाकिस्तानकडून ठोस कारवाई केली जात नाही तोपर्यंत पाकिस्तानशी कोणतीही चर्चा करणार नसल्याचं भारताकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
काही दिवसांपूर्वी बिश्केक येथे शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनकडून बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. चीनच्या पुढाकाराने झालेल्या ही बैठक आशियासाठी महत्त्वाची होती. पाकिस्तानलाही तिचे आमंत्रण होते. लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळाल्यानंतर नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान प्रथमच एकाच व्यासपीठावर आले होते. नेहमीचे नाट्यतंत्र वापरून मोदी इमरान खानबरोबर गळाभेट करतील, अशी अनेकांची अपेक्षा होती. निदान हस्तांदोलन करतील, याची खात्री होती. २०१५मध्ये मोदींनी अचानक लाहोर येथे विमान उतरवून त्या वेळचे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भेट घेतली होती. तसेच काही या वेळी होईल, असे वाटत होते; पण ती अपेक्षा पुरी झाली नाही. गळाभेट दूर राहो, मोदींनी इमरान खान यांच्याशी हस्तांदोलनही केले नाही. परिषद समाप्त होत असताना मोदी व इमरान खान एकमेकांशी सौजन्याचे चार शब्द बोलले, असे पाकिस्तानकडून सांगण्यात आले. भारताने त्याला दुजोरा दिला नाही.
बिश्केकमध्ये पंतप्रधानांनी दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला होता, दहशतवादाविरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं होतं. गेल्या काही दिवसांपूर्वी श्रीलंकेत दहशतवादाचा क्रूर चेहरा समोर आला. सर्वच मानवतावादी शक्तींनी या दहशतवादाशी निपटण्यासाठी एकत्र आलं पाहिजे. दहशतवाद्यांना निधी पुरवणाऱ्या देशांचं फंडिंग बंद केलं पाहिजे, असंही मोदी म्हणाले होते.