Narendra Modi: पीएम मोदींनी केली संत रविदास मंदिरात पूजा, महिलांसोबत घेतला भजन कीर्तनाचा आस्वाद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 11:40 AM2022-02-16T11:40:27+5:302022-02-16T11:49:53+5:30
आज संत रविदास जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील करोलबाग येथील गुरु रविदास विश्राम धाम मंदिरात पोहोचले.
नवी दिल्ली: आज संत रविदास जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) दिल्लीतील करोलबाग येथील गुरु रविदास विश्राम धाम मंदिरात पोहोचले. यावेळी त्यांनी पुजा-प्रार्थना केली. यानंतर पीएम मोदींनी मंदिर परिसरात उपस्थित महिलांसोबत भजन कीर्तनाचा आस्वाद घेतला.
मोदींनी वाजवला मंदिरा
गुरु रविदास विश्राम धाम मंदिरात पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सर्वप्रथम संत रविदासांचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी मंदिरात उपस्थित भाविकांची भेट घेतली आणि महिलांसोबत कीर्तनात सामील झाले. यावेळी पीएम मोदी भक्तांसोबत बसून मंजिरा वाजवताना दिसले.पीएम मोदी भजन करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यादरम्यान मोदींनी उपस्थितांसोबत संवादही साधला.
Very special moments at the Shri Guru Ravidas Vishram Dham Mandir in Delhi. pic.twitter.com/PM2k0LxpBg
— Narendra Modi (@narendramodi) February 16, 2022
समाजसुधारक होते संत रविदास
संत रविदास यांचा जन्म 16व्या शतकात उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे झाला होता. ते समाजसुधारक होते, त्यांनी अस्पृश्यतेला विरोध केला. समाजासाठी काम करताना त्यांनी कधीही आपला व्यवसाय सोडला नाही. ते नेहमी म्हणायचे की कर्म कधीच सोडू नका. संत रविदासांनीही 'मन चंगा तो कठौती में गंगा’ असा संदेश दिला.
उत्तर प्रदेश-पंजाबमध्ये अनुयायी
विशेष म्हणजे पंजाब आणि उत्तर प्रदेशात संत रविदासांचे अनुयायी मोठ्या संख्येने आहेत. त्यांना रविदास किंवा रैदास म्हणून ओळखले जाते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पीएम मोदींची संत रविदासांच्या मंदिराची भेट घेतली आहे. संत रविदास जयंतीचे महत्त्व तुम्हाला यावरूनही समजू शकते की, पंजाबमध्ये यापूर्वी 14 फेब्रुवारीला विधानसभा निवडणुका होणार होत्या, मात्र निवडणूक आयोगाने पुन्हा निवडणुकांची तारीख वाढवली. आता पंजाबमध्ये 20 फेब्रुवारीला विधानसभेची निवडणूक होणार आहे. रविदास जयंतीमुळे मोठ्या प्रमाणात लोक राज्याबाहेर जाणार आहेत, त्यामुळे निवडणुकीची तारीख वाढवावी, असे पत्र काँग्रेससह अनेक पक्षांनी निवडणूक आयोगाला दिले होते.