वाचाळवीरांवर मोदींची वक्रदृष्टी

By admin | Published: March 7, 2016 11:16 PM2016-03-07T23:16:03+5:302016-03-07T23:16:03+5:30

वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्यांवर मोदींना आता थेट कारवाईच हवी आहे. अशा वाचाळवीरांसाठी ही धोक्याची घंटा समजली जात आहे. भाजपशासित राज्ये आणि केंद्रीय गृहमंत्रालयाला त्यांनी तसे सूचितच केले आहे

Narendra Modi's aptitude | वाचाळवीरांवर मोदींची वक्रदृष्टी

वाचाळवीरांवर मोदींची वक्रदृष्टी

Next

हरीश गुप्ता,  नवी दिल्ली
वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्यांवर मोदींना आता थेट कारवाईच हवी आहे. अशा वाचाळवीरांसाठी ही धोक्याची घंटा समजली जात आहे. भाजपशासित राज्ये आणि केंद्रीय गृहमंत्रालयाला त्यांनी तसे सूचितच केले आहे की, कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. तथापि, असा प्रयत्न कोणी केल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाईचे संकेत त्यांनी दिले आहेत. राष्ट्रवाद विरुद्ध स्वातंत्र्याची ही चर्चा देशात उग्र रूप धारण करू शकते. कायदेविषयक संस्थांनी अशा प्रवृत्तींना रोखण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
एकीकडे पंतप्रधान मोदींनी कडक संकेत दिलेले असतानाच त्याचा पोलीस कृतीतील प्रत्यय दिल्ली आणि छत्तीसगढमधील रायपूरमध्ये आला. दिल्ली पोलिसांनी पूर्वांचल सेनेचा प्रमुख आदर्श कुमार याला सोमवारी अटक केली. जेएनयूमधील विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैयावर याच आदर्श कुमारने दोन दिवसांपूर्वी ११ लाखांचे इनाम ठेवले होते. दरम्यान, छत्तीसगढमध्ये स्थानिक चर्चमध्ये नासधूस करणाऱ्या हिंदू कार्यकर्त्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली आहे. अशा घटनांत पोलीस कारवाईच होत नाही, असे म्हणणाऱ्यांच्या भुवया मात्र यानिमित्ताने उंचावल्या आहेत.
विशेष म्हणजे पूर्वांचल सेनेच्या ज्या आदर्श कुमारला दिल्ली पोलिसांनी रोहिणी भागातून अटक केली तोसुद्धा बिहारमधील बेगुसराईचा असल्याचे उघड झाले. कन्हैया कुमारही बेगुसराईचाच आहे. पोलीस त्याच्या पूर्वेतिहासाची अजून खातरजमा करीत आहेत; परंतु आदर्श हा कन्हैया कुमारला माहीत नाही.
हिंदुत्ववादी विचारांच्या नेत्यांनी असल्या प्रवृत्तींशी आम्हाला काहीही देणेघेणे नाही याचे संकेत आधीच दिले आहेत. भाजपचे सरकार असलेल्या छत्तीसगढच्या रायपूरमध्ये स्थानिक चर्चची नासधूस करणाऱ्या नऊ जणांना (त्यात सहा जण अल्पवयीन आहेत) अटक करण्यात आली आहे. या नऊ जणांचा उजव्या विचारांच्या शक्तीशी काहीही संबंध नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तरीही या सगळ्यांनी आमचा उजव्या विचारसरणीशी जवळचा संबंध असल्याचा दावा केला आहे. हल्ला झाला त्याचा व्हिडिओ सगळीकडे पसरल्यावर (व्हायरल) पोलीस हल्लेखोरांना ओळखू शकले. सत्ताधारी पक्षाच्या व्यवस्थापकांना जेएनयूमधील घटना हे मोठा फायदा देणारे घबाडच असल्याचे वाटते. एवढेच काय कन्हैयाचे पाठीराखेही महत्त्वाच्या प्रश्नांवर बचावात्मक पवित्र्यात गेले आहेत.

Web Title: Narendra Modi's aptitude

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.