आई दुस-यांच्या घरी मोलमजुरी करायची हा नरेंद्र मोदींचा दावा खोटा - काँग्रेस
By admin | Published: September 28, 2015 01:18 PM2015-09-28T13:18:36+5:302015-09-28T13:24:29+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे चहा विकत होते याची माहिती शोधपत्रकारांनी काढावी असं सांगत काँग्रेसने मोदी सांगतात तेवढी काही त्यांची सांपत्तिक स्थिती खराब नव्हती असा आरोप केला आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २८ - पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे चहा विकत होते याची माहिती शोधपत्रकारांनी काढावी असं सांगत काँग्रेसने मोदी सांगतात तेवढी काही त्यांची सांपत्तिक स्थिती खराब नव्हती असा आरोप केला आहे. आई इतरांच्या घरी मोलमजुरी करायची असं मोदी डोळ्यात आसवं आणून सांगतात, परंतु आम्ही माहिती काढली असून हा दावा खोटा असल्याचं काँग्रेसच्या आनंद शर्मा यांनी म्हटलं आहे. मोदी मुख्यमंत्री होते, परंतु त्यांनी कधीही आईला आपल्याजवळ रहायला बोलावलं नाही असं सांगत नरेंद्र मोदी विदेशामध्ये आईच्या आठवणी काढत डोळ्यात पाणी आणतात आणि नाटक करतात असा आरोप शर्मा यांनी केला आहे. मोदींच्या आई वडिलांची सांपत्तिक स्थिती ते सांगतात तेवडी काही वाईट नव्हती असंही शर्मा म्हणाले. मोदींवर घणाघाती हल्ला चढवताना आनंद शर्मा यांनी मोदी विदेशामध्ये जाऊन आधीच्या नेत्यांबद्दल भलतेसलते आरोप करतात, जे त्यांना शोभत नाही असं शर्मा म्हणाले.
नरेंद्र मोदींच्या अमेरिकेतील भाषणानंतर काँग्रेसने मोदींवर हल्ला चढवला असून मोदी आधीच्या काँग्रेसच्या पंतप्रधानांच्या कामगिरीची दखल तर घेत नाहीतच शिवाय त्यांचं कार्यही स्वत:च्या नावावर खपवतात असा आरोप शर्मा यांनी केला आहे.
आनंद शर्मांच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे:
- मोदींची आई दुस-यांच्या घरी मोलमजुरी करायची हा मोदींचा दावा चुकीचा आहे. आम्ही माहिती काढली असून हे खरं नसल्याचा आरोप आनंद शर्मा यांनी केला आहे. आई मोलमजुरी करत नव्हती मोदींच्या आईवडिलांची सांपत्तिक स्थिती इतकी काही वाईट नव्हती असं सांगत त्यांनी आईचा अपमान केल्याचा आरोप शर्मा यांनी केला आहे.
- नरेंद्र मोदी गरीबांचं कल्याण करण्याची भाषा सतत करतात, परंतु त्यांच्या सगळ्या कृती या गरीबांच्या विरोधात आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकरी, आसाममधला पूर अशा अनेक आपत्तींच्यावेळी ते लोकांना भेटले नाहीत व मन की बातही केली नाही. गरीबांसाठी असलेल्या सगळ्या योजनांमधल्या निधीला मोदींनी मोठ्या प्रमाणात कात्रीच लावली आहे.
- नरेंद्र मोदी अत्यंत नाट्यमय भाषण करतात, आणि भारतीय मीडिया त्यांना सातत्याने प्रकाशझोत देतो. माझं प्रसारमाध्यमांना आवाहन आहे, त्यांनी जरा शोधपत्रकारिता करून त्यांनी कुठे चहा विकला ते शोधावं.
- नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना बारा वर्षात ज्या ज्यावेळी त्यांनी विमानप्रवास केला त्या त्यावेळी त्यांनी अत्यंत लक्झरी चार्टर्ड फ्लाइट्सचा वापर केला असून त्यांच्या तोंडी मात्र भाषा गरीबांच्या हिताची असते.
- आधीच्या नेत्यांनी व त्यांच्या नातेवाईकांनी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप विदेशात करणं पंतप्रधान पदावरच्या व्यक्तिला शोभत नाही.
- आपल्या आधीच्या सगळ्या पंतप्रधानांना सातत्याने खाली दाखवण्याचं काम फक्त नरेंद्र मोदी करतात जी अत्यंत चुकीची गोष्ट आहे.
- जगातल्या कुठल्याही देशाचा पंतप्रधान विदेशात जाऊन स्वत:चा प्रचार करत नाही, जे नरेंद्र मोदी करतात. ही त्यांची मानसिकता दर्शवते. त्यांची मानसिक तपासणी करण्याची गरज आहे.
- नरेंद्र मोदींच्या अधिकृत परदेश दौ-यांचा गैरवापर करण्यात येत असून मोदी व भाजपाच्या प्रचारासाठी हा खर्च करण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
- नरेंद्र मोदी युपीएने सुरु केलेल्या चार सरकारी योजना नामकरण करुन नव्याने मांडण्याचा प्रयत्न करत आहे.
- भारतात माहिती तंत्रज्ञान क्रांतीचे जनक राजीव गांधी होते.
- संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या ठरावात भारताने रशियासारख्या जुन्या मित्रदेशाचा पाठिंबा गमावला, हे का झाले याचे सरकारने उत्तर द्यावे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासीयांची दिशाभूल करत आहेत.
- नरेंद्र मोदींना मानसिक उपचार घेण्याची गरज आहे.