पराभव दिसत असल्यानेच नरेंद्र मोदींचा खोटारडेपणा, डॉ. मनमोहन सिंग यांचे सडेतोड प्रत्युत्तर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 12:25 AM2017-12-12T00:25:39+5:302017-12-12T00:25:55+5:30
गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव स्पष्ट दिसत असल्याने हताश नरेंद्र मोदी काँग्रेस पक्ष व त्याच्या नेत्यांविरुद्ध धादान्त खोटे आरोप करून राजकीय कुरघोडी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु याने आपण पंतप्रधानांच्या उच्च पदाची अप्रतिष्ठा करीत आहोत, याचेही त्यांना भान नसावे याची कीव वाटते, असे जोरदार प्रत्युत्तर माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी सोमवारी दिले.
नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव स्पष्ट दिसत असल्याने हताश नरेंद्र मोदी काँग्रेस पक्ष व त्याच्या नेत्यांविरुद्ध धादान्त खोटे आरोप करून राजकीय कुरघोडी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु याने आपण पंतप्रधानांच्या उच्च पदाची अप्रतिष्ठा करीत आहोत, याचेही त्यांना भान नसावे याची कीव वाटते, असे जोरदार प्रत्युत्तर माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी सोमवारी दिले.
काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांच्या निवासस्थानी ६ डिसेंबर रोजी झालेल्या भोजनबैठकीचा संदर्भ देत मोदी यांनी रविवारी गुजरातमधील सभेत काँग्रेसवर पाकधार्जिणे असल्याचा व गुजरात निवडणुकीत पाक हस्तक्षेप करीत असल्याचा आरोप केला होता.
राष्ट्रद्रोहाचा आरोप करणे चुकीचे
डॉ. मनमोहन सिंग यांनी अत्यंत खरमरीत निवेदन प्रसिद्ध केले. ते म्हणतात की, अय्यर यांच्या घरी झालेल्या बैठकीत गुजरात निवडणुकीचा विषय कोणी काढला नाही की त्यावर अजिबात चर्चा झाली नाही. चर्चा फक्त भारत-पाकिस्तान संबंधांपुरतीच मर्यादित होती. त्या बैठकीला जे हजर होते त्यापैकी कोणावरही राष्ट्रद्रोहाचा आरोप केला जाऊ शकत नाही.
गेल्या पाच दशकात मी सार्वजनिक जीवनात राहून देशासाठी केलेली सेवा सर्वज्ञात आहे. राजकीय कुरघोडी करण्यासाठी मोदींसह कोणीही माझ्या देशसेवेविषयी दुरान्वयानेही शंका घेऊ शकत नाही, असेही डॉ. सिंग यांनी ठामपणे नमूद केले.
पंतप्रधान या उच्च पदाकडून अपेक्षित असलेली प्रगल्भता व गांभीर्य दाखवून नरेंद्र मोदी अविवेकी कुरघोडी करण्यासाठी धरबंद सोडण्याऐवजी देशाची माफी मागून पदाची आब राखतील, अशी माझी प्रामाणिक अपेक्षा आहे.
- डॉ. मनमोहन सिंग, माजी पंतप्रधान