नरेंद्र मोदी सरकारचा केवळ दिखाऊपणा
By admin | Published: August 30, 2015 10:17 PM2015-08-30T22:17:40+5:302015-08-30T22:17:40+5:30
मोदी सरकारने ‘शोबाजी’शिवाय काहीही केले नाही. याउलट मनरेगासारख्या महत्त्वपूर्ण सामाजिक सुरक्षा योजनेच्या निधीत मोठी कपात केली. केवळ आश्वासने देणाऱ्या
पाटणा : मोदी सरकारने ‘शोबाजी’शिवाय काहीही केले नाही. याउलट मनरेगासारख्या महत्त्वपूर्ण सामाजिक सुरक्षा योजनेच्या निधीत मोठी कपात केली. केवळ आश्वासने देणाऱ्या सरकारवरील जनतेचा विश्वास उडाला आहे, असे सांगत काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पाटण्यातील स्वाभिमान रॅलीत प्रमुख विरोधी पक्षनेत्यांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. ऐतिहासिक गांधी मैदानावर आयोजित सभेत सोनिया गांधी यांच्यासोबत मुख्यमंत्री नितीशकुमार, राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी एकाच व्यासपीठावर येत संयुक्त प्रचाराचा नारळ फोडला.
मोदी सरकारने आपल्या कार्यकाळाचा एकचतुर्थांश भाग पूर्ण केला आहे. या सरकारने आजपर्यंत शोबाजीशिवाय काहीही केले नाही. हे तुम्ही माझ्यापेक्षा चांगले जाणता. केंद्र सरकारने एक कोटी लोकांना रोजगार देण्याचे आश्वासन पाळलेले नाही. दुसरीकडे सरकारी नोकऱ्यांमधील संधी सीमित केल्या आहेत. बिहारचा इतिहास गौरवशाली आहे. चंद्रगुप्त, चाणक्य, गुरू गोविंदसिंग, बाबू वीर कुंवरसिंग याच भूमीवर वाढले. मी येथील स्वाभिमानी लोकांना प्रणाम करते. मोदींनी मात्र डीएनएबद्दल शेरेबाजी करीत बिहारच्या जनतेचा अपमान केला आहे. येथील जनतेला चुकीच्या रूपात दाखविले. काही लोकांना बिहारची टर उडविण्यात आनंद मिळतो. त्यांनी संधी मिळेल तेव्हा बिहारचा अपमान केला आहे. या राज्यातील लोकांच्या डीएनएमध्ये बिघाड असल्याचे सांगत या राज्याला अपमानित केले आहे. कधी बिहारला बिमारू राज्य म्हटले आहे. काँग्रेसने नेहमी या राज्यातील जनतेचा सन्मान आणि प्रतिभेचा आदर केला आहे, असेही त्या म्हणाल्या.
मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी काळा पैसा परत आणून प्रत्येक भारतीयाच्या खात्यात १५ ते २० लाख रुपये जमा करण्याचे तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना त्यातील ५ ते १० टक्के रक्कम देण्याचे आश्वासन दिले होते. युवकांना नोकऱ्यांचे वचन दिले. आता लोकांची फसगत झाल्याची भावना झाली आहे, असे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी म्हटले.
१४ महिन्यांनंतर बिहारची आठवण आली आणि त्यांनी १.२५ लाख कोटींच्या विशेष पॅकेजची घोषणा केली. त्यातील ८७ टक्के रक्कम जुन्याच योजनांसाठीची आहे. रिपॅकेजिंगला विशेष पॅकेज संबोधण्यात आले आहे, असेही ते म्हणाले. माझे वडील स्वातंत्र्यसेनानी होते. माझ्या डीएनएला आव्हान देणाऱ्यांच्या पूर्वजांचे स्वातंत्र्यलढ्यात कोणतेही योगदान नव्हते, असा उल्लेखही त्यांनी केला.
मोदींनी भूसंपादन वटहुकूम जारी न करण्याची घोषणा केल्याबद्दल नितीशकुमार यांनी आजचा दिवस आनंदाचा आहे, अशी प्रतिक्रिया दिली.
गांधी मैदानावर स्वाभिमान रॅलीच्या स्थळी रविवारी डीएन नमुने गोळा करण्यासाठी ८० काऊंटर उघडण्यात आले होते. ‘शब्दवापसी’ या मोहिमेंतर्गत जेडीयूच्या कार्यकर्त्यांनी लोकांना डीएनए गोळा करण्याचे आवाहन केले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्लास्टिकच्या पाऊचमध्ये अनेकांनी केस आणि नखांचे नमुने देत सहभाग नोंदविला. मोदी यांचे निवासस्थान असलेल्या ७ रेसकोर्स रोडवरील निवासस्थानाचा पत्ता पाकिटावर नोंदविण्यात आला आहे.
(वृत्तसंस्था)