नरेंद्र मोदी गुरूजींची ‘परीक्षा पे चर्चा’; स्वत:च्या क्षमतांना आव्हान द्या, वाढेल तुमचा आत्मविश्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 12:26 AM2018-02-17T00:26:13+5:302018-02-17T00:26:23+5:30
‘आज मी विद्यार्थी आणि तुम्ही सगळे परीक्षक आहात. तुम्हीच मला १० पैकी गुण द्या. गुण देताना मी पंतप्रधान आहे, हा विचार मनात आणू नका. असे समजा की मी तुमचा मित्र आहे,’ अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी दहावी व बारावीच्या परीक्षेला बसणाºया विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांच्यावरील परीक्षेचा ताण हलका करण्याचा प्रयत्न केला.
नवी दिल्ली : ‘आज मी विद्यार्थी आणि तुम्ही सगळे परीक्षक आहात. तुम्हीच मला १० पैकी गुण द्या. गुण देताना मी पंतप्रधान आहे, हा विचार मनात आणू नका. असे समजा की मी तुमचा मित्र आहे,’ अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी दहावी व बारावीच्या परीक्षेला बसणाºया विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांच्यावरील परीक्षेचा ताण हलका करण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांनीही पंतप्रधानांनी मनमोकळेपणाने प्रश्न विचारले.
विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाकडून खास परीक्षा पे चर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी पंतप्रधानांना अनेक प्रश्न विचारले. काहींनी शंकाही विचारल्या. या कार्यक्रमाला अनेक पालकही उपस्थित होते. या विद्यार्थ्यांचे मोदी आज गुरूजीच बनले होते. यावेळी मोदी यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी येणारा तणाव कसा घालवायचा आणि आत्मविश्वास कसा वाढवावा याबाबत मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, आपण अनेकदा प्रामाणिकपणे तयारी करतो, परंतु आत्मविश्वास नसेल तर तुम्ही अखेरच्या क्षणी काही गोष्टी विसरू शकता. कठोर मेहनतीसोबत आपण सतत स्वत:च्या क्षमतांना आव्हान द्यायला हवे. त्यातूनच आत्मविश्वास वाढेल. आपण सतत कामगिरी आणखी चांगली कशी करता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे.
विद्यार्थ्यानेच घेतली पंतप्रधानांची फिरकी!
दिल्लीच्या अकरावीत शिकणाºया गिरीश सिंहच्या एका प्रश्नाने पंतप्रधानांची फिरकी घेतली. गिरीशने विचारले की, सर, पुढच्या वर्षी आपण दोघांचीही परीक्षा आहे. माझी बारावीची परीक्षा आहे आणि तुमच्यासाठी लोकसभा निवडणुकीची. मग तुम्ही या परीक्षेसाठी तयार आहात का, तुम्ही यामुळे अस्वस्थ आहात का? गिरीशचा हा प्रश्न ऐकताच हास्यकल्लोळ उडाला. यावर मोदी यांनी गंमतीने गिरीशला थेट पत्रकार बनण्याचा सल्ला दिला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, तू ज्या पद्धतीने प्रश्न विचारला तसा केवळ पत्रकारच विचारु शकतात!
अनेक लोकांना असे वाटते एकाग्रता हा गुण प्रयत्नपूर्वक शिकावा लागतो. परंतु लक्षात घ्या आपल्यातील प्रत्येक जण दिवसभरात काही ना काही कामे अगदी मन लावून करीत असतो. आत्मविश्वास विकत मिळत नाही. तो स्वत:हून मिळवावा लागतो.
- पंतप्रधान मोदी