"मोदींच्या जीवाला धोका, दाऊद इब्राहिम 5 कोटी देतोय..."; धमकीचा फोन करणारा कामरान कारागृहात, किती वर्षांची झाली शक्षा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 11:05 IST2025-04-03T11:02:41+5:302025-04-03T11:05:25+5:30
दरम्यान आरोपी कामरान खान मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचा बचाव पक्षाचा युक्तिवाद फेटाळत, आरोपीने मानसिक आरोग्यासंदर्भातील आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ कुठलेही पुरावे सादर केले नाहीत, असे न्यायालयाने म्हटले आहे...

"मोदींच्या जीवाला धोका, दाऊद इब्राहिम 5 कोटी देतोय..."; धमकीचा फोन करणारा कामरान कारागृहात, किती वर्षांची झाली शक्षा?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मारण्यासाठी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमम आपल्याला पैसे देऊ करत असल्याचा दावा करणाऱ्या आणि पोलिसांना धमकीचा फोन लावणाऱ्या एका व्यक्तीला मुंबईतील न्यायालयाने दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. एवढेच नाही तर, आरोपीसंदर्भात सहानुभूती दाखवणे योग्य नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी (एस्प्लानेड कोर्ट) हेमंत जोशी यांनी २०२३ च्या खटल्यात २९ मार्च २०२५ रोजी हा निकाल दिला. दरम्यान आरोपी कामरान खान मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचा बचाव पक्षाचा युक्तिवाद फेटाळत, आरोपीने मानसिक आरोग्यासंदर्भातील आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ कुठलेही पुरावे सादर केले नाहीत, असे न्यायालयाने म्हटले आहे.
10 हजार रुपयांचा दंडही ठोठावला -
न्यायालयाने खानला भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 505(2) (समाजात द्वेष, घृना अथवा द्वेष निर्माण करणे किंवा प्रोत्साहन देणे) आणि 506(2) (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत दोषी ठरवले. तसेच त्याला दोन वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेसह १०,००० रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
'दाऊद इब्राहिम पाच कोटी रुपये देतोय' -
फिर्यादी पक्षाच्या म्हणण्यानुसार, आरोपीने नोव्हेंबर २०२३ मध्ये मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला फोन करून सरकारी जेजे हॉस्पिटलमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी दिली होती. तसेच, मोदींच्या जीवाला धोका आहे, दाऊद इब्राहिम ५ कोटी रुपये देत आहे, त्याने मोदींची हत्या करण्यास सांगितले आहे," असेही म्हटले होते.
'मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्यासाठी एक कोटी' -
जागतिक दहशतवादी घोषित करण्यात आलेल्या दाऊद इब्राहिमचे लोक, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्यासाठी आपल्याला १ कोटी रुपयांची ऑफर देत होते, असेही आरोपी म्हणाला होता, असेही न्यायालयात सांगण्यात आले.