नरेंद्र मोदींच्या महाविजयाचे पटकथाकार अमित शहा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 04:57 AM2019-05-24T04:57:02+5:302019-05-24T04:57:18+5:30
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाच्या जादूसोबत भाजप अध्यक्ष अमित शहा यांची व्यूहरचनाही हुबेहूब यशस्वी ठरली.
- नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाच्या जादूसोबत भाजप अध्यक्ष अमित शहा यांची व्यूहरचनाही हुबेहूब यशस्वी ठरली. भाजपच्या महाविजयाचे शिल्पकार नरेंद्र मोदी, तर मोदी यांच्या विजयाची प्रभावी पटकथाकार अमित शहा हे आहेत. यासाठी त्यांनी पक्ष संघटना भक्कम तर केली, सोबतच आघाडीची एकजूटही कुशलतेने शाबूत राखली.
२०१४च्या लोकसभा निवडणुकीत अमित शहा यांनी एनडीएपासून दूर झालेले नितीशकुमार यांना सोबत घेतले. भाजपच्या जिंकलेल्या जागाही त्यांच्यासाठी सोडण्याचे औदार्य दाखविले, तसेच नाराज असलेल्या शिवसेनेची मनधरणी करण्यासाठी ते स्वत: उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी ‘मातोश्री’ येथे गेले. लोकसभा निवडणुकीच्या आधी नाराजी व्यक्त करणाऱ्या अपना दलच्या नेत्या अनुप्रिया पटेल (उत्तर प्रदेश) यांचेही मन वळविले. सलग पाच वर्षांत त्यांनी भाजपप्रणित राष्टÑीय लोकशाही आघाडीतील घटक मित्र पक्षांची संख्या ३९ वर नेली.