नरेंद्र मोदींच्या पाकिस्तानी बहिणीने पाठवली राखी, तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी दिल्या शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2022 08:10 PM2022-08-07T20:10:19+5:302022-08-07T20:42:52+5:30
रक्षाबंधनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी सीमेपलीकडून खास भेट आली आहे.
नवी दिल्ली: देशभरात सध्या रक्षाबंधनाची जोरदार तयारी सुरू आहे. देशभरातील बाजारपेठा राख्यांनी आणि विविध भेटवस्तूंनी सजल्या आहेत. रक्षाबंधनाला बहिणी आपल्या भावाच्या हातावर राखी बांधतात, तर ज्या बहिणी भावापासून दूर राहतात, त्या पोस्टाने त्यांना राखी पाठवतात. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाकिस्तानी बहिणीने असेच काहीसे केले आहे.
रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नरेंद्र मोदींना राखी पाठवली आहे. यासोबतच त्यांनी नरेंद्र मोदींना आगामी निवडणुकांसाठी शुभेच्छाही दिल्या. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना पीएम मोदींची पाकिस्तानी बहीण कमर मोहसिन शेख यांनी सांगितले की, त्यांनी राखीसोबत नरेंद्र मोदी यांना एक पत्रही पाठवले आहे. या पत्रामध्ये त्यांनी नरेंद्र मोदींना तिसर्यांदा पंतप्रधानपदी निवड होण्याच्या आणि निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
स्वतःच्या हाताने बनवली राखी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पाकिस्तानी बहीण कमर मोहसीन शेख यांनी मोदींसाठी पाठवलेली राखी स्वतः तयार केली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना कमर मोहसीन शेख यांनी सांगितले की, त्यांनी सिल्क रिबनमध्ये ही राकी तयार केली आहे. कमर मोहसीन शेख यांना यावेळी नरेंद्र मोदी यांना भेटण्याची इच्छा आहे. तसेच त्यांनी नरेंद्र मोदी आपल्याला दिल्लीला बोलावतील अशी आशा व्यक्त केली.
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार
कमर मोहसीन शेख यांनी सांगितले की, त्यांनी राखीसोबत एक पत्र देखील पाठवले आहे. पत्रामध्ये त्यांनी पंतप्रधानांच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार यात शंका नाही, असेही त्या म्हणाल्या.