नरेंद्र मोदी यांचे राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 01:55 AM2017-11-28T01:55:42+5:302017-11-28T01:56:08+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातेत सोमवारी भाजपच्या प्रचारात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर चीन, हाफीज सईद व सर्जिकल स्ट्राइकवरून हल्ला चढवला. कच्छमधील भूजमधून प्रचाराची सुरुवात करताना मोदी म्हणाले की, गुजरातची निवडणूक
भूज (गुजरात) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातेत सोमवारी भाजपच्या प्रचारात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर चीन, हाफीज सईद व सर्जिकल स्ट्राइकवरून हल्ला चढवला. कच्छमधील भूजमधून प्रचाराची सुरुवात करताना मोदी म्हणाले की, गुजरातची निवडणूक विकासावरील विश्वास आणि घराणेशाहीच्या राजकारण यांच्यातील आहे.
डोकलामच्या पेचाच्या वेळी तुम्ही चीनच्या राजदूतांना भेटला, अशी टीका त्यांनी केली. पण राहुल गांधी यांनी ‘नरेंद्रभाई बात नही बनी. मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार सुटला आहे’, असे जे ट्विट केले होते, त्याचे उत्तर मात्र मोदींनी दिले नाही.
सर्जिकल स्ट्राइकबाबत अभिमान नसेल, तर यावर बोलता तरी कशाला? असा प्रश्न त्यांनी केला. पाकच्या न्यायालयाने एका दहशतवाद्याची सुटका केल्यावर काँग्रेसची मंडळी टाळ्या का वाजवीत आहेत? असा सवाल त्यांनी केला. त्याचा पुरावा मात्र गुजरातीतील भाषणातून त्यांनी दिला नाही. आपल्यावर एकही डाग नाही. तुम्ही माझ्यावर निराधार आरोप करतात. पण जनता तुम्हाला माफ करणार नाही, असे मोदी म्हणाले.
मुंबईतील २६/११ हल्ला आणि उरीतील हल्लाच्या उल्लेख मोदी यांनी केला. उरीत आमच्या जवानांचे त्यांनी प्राण घेतले, तेव्हा आम्ही त्यांच्या हद्दीत सर्जिकल स्ट्राइक केले. पण २६/११ नंतर तुम्ही गप्प बसलात. बुधवारीही मोदी यांच्या सौराष्टÑ व दक्षिण गुजरातमध्ये सभा होणार आहेत. तिथे ९ डिसेंबर रोजी मतदान आहे.
मी चहा विकला, देश नाही
राजकोट : चहा विकण्यावरून खिल्ली उडविण्याच्या काँग्रेसच्या पद्धतीला उत्तर देताना, ‘हो मी चहा विकला, पण देश नाही विकला,’ अशा शब्दांत नरेंद्र मोदींनी काँग्रेसला सुनावले. आपण गरीब कुटुंबातून असल्यामुळे काँग्रेसचे नेते नेहमीच आपला तिरस्कार करतात, अशी टीकाही नरेंद्र मोदींनी केली.
मी गरीब कुटुंबातून आल्यामुळे काँग्रेस नेत्यांना मी आवडत नाही, असे सांगून, एखादा पक्ष इतका खालच्या स्तराला जाऊ शकतो का? असा सवाल त्यांनी केला. गरीब माणूस पंतप्रधान झाल्याने काँग्रेसची मंडळी संतापली आहेत. राजकोटमध्ये सभेत ते बोलत होते.
अपक्ष मेवानी यांना काँग्रेसचा पाठिंबा
-दुसºया टप्प्यातील निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी काँग्रेसने १४ उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली. यात सहयोगी पक्षांना दोन जागा सोडल्या आहेत.
-दलित नेते जिग्नेश मेवानी यांना पक्षाने पाठिंबा जाहीर केला असून, ते वडगाममधून अपक्ष निवडणूक लढविणार आहेत. पक्षाने विद्यमान चार आमदारांना वगळले असून, राधनपूरमधून ओबीसी नेते अल्पेश जाला (ठाकूर) यांना उमेदवारी दिली आहे.
-काँग्रेसने छोटाभाई वसावा यांच्या भारतीय आदिवासी पार्टीला दोन जागा सोडल्या आहेत. उमेदवारी न मिळाल्याने काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्या रेखाबेन चौधरी यांनी राजीनामा दिला.
आनंदीबेन पटेल यांना भाजपाने वगळले
अहमदाबाद : भाजपाने ३४ उमेदवारांची सहावी व अंतिम यादी जारी केली असून, माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल व एका मंत्र्यासह पाच आमदारांना वगळले आहे. मंत्री रोहित पटेल,आमदार नागरजी ठाकोर, आर.एम. पटेल आणि विंछिया भुरिया यांना तिकिट देण्यात आलेले नाही.