नरेंद्र मोदींच्या कामाचा वेग बुलेट ट्रेनसारखा - शिंझो एब
By admin | Published: December 12, 2015 11:43 AM2015-12-12T11:43:18+5:302015-12-12T16:01:15+5:30
धोरणांच्या अमलबजावणीचा नरेंद्र मोदींचा वेग बुलेट ट्रेनप्रमाणे आहे, या शब्दांमध्ये जपानचे पंतप्रधान शिंझो एब यांनी भारतीय पंतप्रधानांचे कौतुक केले
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १२ - धोरणांच्या अमलबजावणीचा नरेंद्र मोदींचा वेग बुलेट ट्रेनप्रमाणे आहे, या शब्दांमध्ये जपानचे पंतप्रधान शिंझो एब यांनी भारतीय पंतप्रधानांचे कौतुक केले आहे. भारत व जपान यांच्यातल्या भागीदारीचा नवा अध्याय दोन्ही देशांसाठी अत्यंत महत्त्वाचा असून दुरगामी परिणाम देणारा असल्याचे एब म्हणाले. एब सध्या भारताच्या तीन दिवसांच्या दौ-यावर आहेत. भारतीय उद्योगपतींशी तसेच वरीष्ठ नेत्यांशी एब यांच्या भेटीचा कार्यक्रम आखण्यात आला आहे.
मोदींची धोरणे वेगवान, सुरक्षित आणि विश्वासार्ह असून अनेक लोकांना बरोबर घेणारी असल्याचे एका कार्यक्रमात बोलताना एब म्हणाले. सशक्त जपान भारताच्या तर सशक्त भारत जपानच्या भल्याचा आहे असंही त्यांनी सांगितले.
जपान व भारत या दोन्ही देशांची आर्थिक स्थिती अनुकूल असून दोन्ही देशांमध्ये प्रचंड संधी असल्याचे मोदी यांनी सांगितले. प्रथमच जपान मारुति सुझुकी या भारतीय प्रकल्पातून वाहने आयात करणार असल्याचे मोदी म्हणाले. मेक इन इंडिया कार्यक्रमासाठी जपानमध्ये १२ अब्ज डॉलर्सच्या निधीची तरतूद करण्यात येत आहे.
शिंझो एब हे एक थोर नेते तर आहेतच शिवाय एक अत्यंत जवळचे मित्रही आहेत, असे वर्णन मोदी यांनी एब यांचे केले आहे. एब व मोदी यांच्या भेटीमध्ये अणुऊर्जेच्या महत्त्वाच्या विषयावरदेखील महत्त्वाचे निर्णय घेतले जातील अशी शक्यता व्यक्त होत आहे.