नरेंद्र मोदींच्या शपथविधीचा खर्च १७.६० लाख
By admin | Published: July 21, 2014 02:07 AM2014-07-21T02:07:35+5:302014-07-21T02:07:35+5:30
नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्यावर तब्बल १७.६० लाख रुपयांचा खर्च झाला.
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्यावर तब्बल १७.६० लाख रुपयांचा खर्च झाला. ऐतिहासिक राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात आयोजित सोहळ्याला देश-परदेशातील ४,०१७ अतिथी उपस्थित होते.
नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यात तंबू, मंच, फर्निचर आणि अन्य सामग्रीवर १७.६० लाख रुपये खर्च आला, असा तपशील माहिती अधिकार कायद्यांतर्गत केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राष्ट्रपती मालमत्ता मंडळाने दिला; मात्र या खर्चाची माहिती आरटीआय अर्जावर देण्यास राष्ट्रपती सचिवालयाने नकार दिला. सचिवालय कार्यक्रमानुसार खर्चाचा तपशील ठेवत नाही, त्यामुळे माहिती दिली जाऊ शकत नाही, असे सचिवालयाचे म्हणणे होते. कार्यक्रमांवरील खर्च संस्थेच्या वार्षिक तरतुदीतून करण्यात येतो. २६ मे २०१४ ला मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यात ४,०१७ अतिथी सहभागी झाले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)