'मिशन शक्ती'वरून पंतप्रधान नरेंद्र मोदी अडचणीत; आयोगाने भाषणाची प्रत मागविली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 10:08 PM2019-03-27T22:08:57+5:302019-03-27T22:09:50+5:30
भारतानं मिसाइलच्या सहाय्यानं उपग्रह पाडला असून मिसाइलच्या सहाय्यानं उपग्रह पाडणाऱ्या देशांच्या यादीत अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारत चौथा देश ठरला आहे.
नवी दिल्ली : अंतराळात घिरट्या घालणारा उपग्रह नष्ट करत भारताने जगात चौथा नंबर पटकाविला असताना याची घोषणा करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी अडचणीत आले आहेत. लोकसभेच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप तृणमूल काँग्रेससह माकपच्या नेत्यांनी केला असून निवडणूक आयोगाने मोदींच्या भाषणाची प्रतही मागविली आहे.
भारतानं मिसाइलच्या सहाय्यानं उपग्रह पाडला असून मिसाइलच्या सहाय्यानं उपग्रह पाडणाऱ्या देशांच्या यादीत अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारत चौथा देश ठरला आहे. वैज्ञानिकांनी अंतरिक्षात 300 किमी दूर लो अर्थ ऑरबिट लाइव्ह सॅटेलाइटला पाडल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. यासाठी मोदीजी टीव्ही, रेडियो आणि समाज माध्यमांवर लाईव्ह आले होते. त्यावर आता विरोधकांकडून टीका करण्यात येत असून मोदींनी आचारसंहितेचा भंग केल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. मोदींनी केलेली घोषणा निव्वळ नाटक असल्याचे म्हटले आहे.
याबाबतचे पत्र तृणमूल काँग्रेसने आणि माकपने निवडणूक आयोगाला पाठविले असून पंतप्रधान मोदींनी या भाषणाची परवानगी घेतली होती का असा सवालही विचारला आहे.
तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी मोदींवर हल्लाबोल करताना ट्विट केले की, भारताचा मिशन शक्ती कार्यक्रम अनेक वर्षांपासून आंतरराष्ट्रीय पातळीवर आहे. आपले शास्त्रज्ञ, डीआरडीओ आणि इस्रोचा आम्हाला नेहमीच अभिमान वाटतो. परंतु, पंतप्रधान मोदी यांच्याकडून या संदर्भात करण्यात आलेली घोषणा म्हणजे निव्वळ नाटक आहे. मोदींकडून निवडणुकीच्या काळात राजकीय फायदा घेण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू आहेत. आदर्श आचारसंहितेचा हा भंग आहे. आपला कार्यकाळ समाप्त होण्यापूर्वी या मिशनची घोषणा करण्याची आवश्यकता नव्हती, असंही ममता यांनी म्हटले आहे.
There is no great urgency in conducting and announcing the mission now by a government past its expiry date. It seems a desperate oxygen to save the imminent sinking of the BJP boat. We are lodging a complaint with the Election Commission. 4/4
— Mamata Banerjee (@MamataOfficial) March 27, 2019