मोदींच्या ‘उडान’ योजनेची हवाई क्षेत्रात गरुडभरारी; नवी ७० विमानतळे उभारली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 07:35 AM2022-12-10T07:35:29+5:302022-12-10T07:36:02+5:30

नागरी उड्डयनमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी साधला ‘लोकमत’शी संवाद

Narendra Modi's 'Udan' plan is flying in the air; 70 new airports were built | मोदींच्या ‘उडान’ योजनेची हवाई क्षेत्रात गरुडभरारी; नवी ७० विमानतळे उभारली

मोदींच्या ‘उडान’ योजनेची हवाई क्षेत्रात गरुडभरारी; नवी ७० विमानतळे उभारली

Next

सुरेश भुसारी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘उडान’ या योजनेतून देशातील हवाई क्षेत्रात क्रांती झाली असून, गेल्या सहा वर्षांत देशात नव्या ७० विमानतळांची उभारणी झाली, तर ११ नव्या विमान कंपन्यांनी विमानसेवा सुरू केली. यात ३ स्टार्टअपचा समावेश असल्याची माहिती केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली.

ज्योतिरादित्य शिंदे यांनी ‘लोकमत’ला विशेष मुलाखत दिली. यात देशाने हवाई क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा आलेख मांडला, तर महाराष्ट्रात हवाई क्षेत्रात मोठी संधी असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. कोल्हापूर-नाशिक विमानसेवेने जोडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या उडान योजनेबद्दल ते म्हणाले, विमानाने प्रवास केवळ मोठ्या शहरातील लोकांची मक्तेदारी राहू नये या उद्देशाने पंतप्रधानांनी ही योजना सुरू केली. 

या योजनेने देशाच्या हवाई क्षेत्रात क्रांती घडविली आहे. दरभंगासारख्या शहरात विमानाने जाणे शक्य झाले आहे. महाराष्ट्राबाबत बोलायचे तर कोल्हापूर, नाशिक ही शहरे विमानसेवेने जोडली आहेत.

‘उडे देश के आम नागरिक’ साकार
या योजनेतून देशात नवी ७० विमानतळे उभारली आहेत. गेल्या ६ वर्षांत १ कोटी १० लाख प्रवाशांचा टप्पा आपण ओलांडला आहे. हे लक्षात घ्या की, या काळात सारे जग कोरोनाचा सामना करीत होते. तरीही आपण हे लक्ष्य साध्य केले आहे. या काळात २ लाख १५ हजार विमानांची उड्डाणे झाली. देशात ४५३ विमाने उपलब्ध आहेत. हे सर्व पंतप्रधानांच्या संकल्पनेतून साकार झालेले आहे. ७०० विमानांची आवश्यकता आहे. भविष्यात दरवर्षी १०० विमानांची भर पडणार आहे. ‘उडे देश के आम नागरिक’ हे पंतप्रधानांचे स्वप्न या योजनेने साकार झाले आहे. 

एमआरओत देश स्वावलंबी
एमआरओच्या क्षेत्रात स्वदेशी तंत्रज्ञान आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगून ते म्हणाले, साफ्रान या कंपनीने देशात १५० मिलियन डॉलरची गुंतवणूक करण्यासाठी करार केला आहे. विमानांची दुरुस्ती स्वदेशी तंत्रज्ञानाने झाली पाहिजे, हे केंद्र सरकारचे  ध्येय आहे.

महाराष्ट्राने व्हॅट कमी करावा : एअर टर्बाईन फ्युएलवरील व्हॅट महाराष्ट्रात १६ ते २० टक्के व्हॅट आकारला जातो, हवाई क्षेत्रात महाराष्ट्राला प्रगती करावयाची असल्यास व्हॅट १ ते ४ टक्के असला पाहिजे. याशिवाय या क्षेत्रात महाराष्ट्राला प्रगती साधता येणार नाही, असेही मंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

एफआरटीप्रणाली पुण्यातही : विमानतळावर नुकतीच फेसियल प्रणाली सुरू झाल्याचे सांगून मंत्री शिंदे म्हणाले, प्रवाशांचे बोर्डिंग कमी वेळात व्हावे यासाठी सध्या तीन विमानतळांवर ही प्रणाली आहे. दुसऱ्या टप्प्यात पुणे, हैदराबाद, कोलकाता व विजयवाडा या विमानतळांवर ही प्रणाली सुरू होईल. 

Web Title: Narendra Modi's 'Udan' plan is flying in the air; 70 new airports were built

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.