Narendra Modi: देशाला लुटणाऱ्यांकडून परत घ्यायची हीच ती वेळ; लाल किल्ल्यावरुन PM मोदींचा थेट इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2022 09:38 IST2022-08-15T09:36:46+5:302022-08-15T09:38:33+5:30
Narendra Modi: आतापर्यंत भारताने जे ठरवले, ते करून दाखवले. आता स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशवासीयांनी पाच संकल्प करणे आवश्यक आहे.

Narendra Modi: देशाला लुटणाऱ्यांकडून परत घ्यायची हीच ती वेळ; लाल किल्ल्यावरुन PM मोदींचा थेट इशारा
नवी दिल्ली - देशभरात भारताच्या स्वातंत्र्याचा ७५ व्या अमृत महोत्सव जल्लोषात साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण करून देशवासीयांना संबोधित केले. भारताची विविधता हीच भारताची खरी ताकद आहे. भारत ही लोकशाहीची जन्मभूमी आहे. लोकशाही हेच भारताचे खरे सामर्थ्य आहे. देशातील सामूहिक चेतना हीच देशाची ऊर्जा आहे. देशासमोर येणाऱ्या कोणत्याही संकटाना भारत देश पूर्ण ताकदीने सामोरे गेला. मात्र, आता देशासमोर आणखी दोन समस्या आहेत, असे म्हणत मोदींनी भ्रष्टाचार आणि घराणेशाहीवर प्रहार केला.
आतापर्यंत भारताने जे ठरवले, ते करून दाखवले. आता स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशवासीयांनी पाच संकल्प करणे आवश्यक आहे. या संकल्पातून पुन्हा एक बलसागर भारत घडवायचा आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन म्हटले. तसेच, देशातील भ्रष्टाचार आणि घराणेशाहीवर प्रहार करताना त्यांनी भ्रष्टाचारांना कुठलाही थारा देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले. एखाद्या भ्रष्टाचारी व्यक्तीचा तपास होतो, त्याच्यावर कारवाई केली जाते. त्याला तुरुंगात टाकले जाते, त्यानंतर न्यायालयाकडूनही त्याला दोषी ठरविण्यात येते. तरीही काहीजण या भ्रष्टाचारी लोकांचं समर्थन करतात, असे म्हणत एकप्रकारे मोदींनी काँग्रेस नेत्यांवर निशाणा साधला. तसेच, केंद्रीय तपास यंत्रणांकडून सुरू असलेल्या कारवाईचं समर्थनच केलं आहे. देशाला लुटून खाणाऱ्या भ्रष्टाचारी लोकांकडून आता लुटलेला माल परत घेण्याची वेळ आलीय, असे म्हणत मोदींनी लाल किल्ल्यावरुन पुन्हा एकदा थेट इशारा दिला आहे.
भ्रष्टाचार देश को दीमक की तरह खोखला कर रहा है, उससे देश को लड़ना ही होगा।
— PMO India (@PMOIndia) August 15, 2022
हमारी कोशिश है कि जिन्होंने देश को लूटा है, उनको लौटाना भी पड़े, हम इसकी कोशिश कर रहे हैं: PM @narendramodi
देशासमोर सर्वात मोठ्या दोन समस्या आहेत. त्या म्हणजे भ्रष्टाचार आणि घराणेशाही. या दोन्ही समस्यांना आपण संपवून टाकायचं आहे. ज्यांनी देशाला लुटून खाल्लंय, त्यांच्याकडून आता परत घ्यायची वेळ आली आहे, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी केंद्रीय संस्थांकडून होत असलेल्या कारवाईचं अप्रत्यक्षपणे समर्थनच केलं आहे. तसेच, देशातील राजकारणात असलेल्या घराणेशाहीवर हल्लाबोलही केला. मोदींनी कुठल्याही राजकीय घराण्याचं नाव न घेता, घराणेशाहीवर निशाणा साधला. मी माझी लेकरं, माझा भाऊ, माझ्या भावाची लेकरं, माझा पुतण्या अशा राजकारणाने देशातील राजकीय वातावरण बिघडल्याचं मोदींनी म्हटलं. त्यामुळे, देशवासीयांना या घराणेशाहीच्या राजकारणाला हद्दपार करायला हवं, असेही ते म्हणाले.
देश के सामने दो बड़ी चुनौतियां
पहली चुनौती - भ्रष्टाचार
दूसरी चुनौती - भाई-भतीजावाद, परिवारवाद: PM @narendramodi— PMO India (@PMOIndia) August 15, 2022
पंतप्रधान मोदींचे पंचप्राण संकल्प
पंतप्रधान मोदींनी पहिला संकल्प सांगितला इप्सित भारत घडवण्याचा. दुसरा संकल्प म्हणजे, गुलामीचा एकही अंश भारतातील कोणत्याही भागात नाही. तसेच यापुढेही तो राहता कामा नये. शेकडो वर्षातील गुलामीला नष्ट करायची आहे. तिसरा संकल्प म्हणजे आपल्याला आपल्या वारसा जपायचा आहे. आपल्या वारसावर आपल्याला गर्व असायला हवा. चौथा संकल्प एकतेचा आहे. पाचवा संकल्प हा नागरिकांच्या कर्तव्यांचा आहे. यामध्ये अगदी पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपासून देशाता प्रत्येक नागरिक येतो, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले. तसेच भारताकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलला आहे. पुढील २५ वर्षे देशासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.
प्रत्येक भारतीयाला तिरंगा ध्वजामुळे प्रेरणा मिळाली
महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्मरण करण्याची ही वेळ आहे. प्रत्येक भारतीयाला तिरंगा ध्वजामुळे प्रेरणा मिळाली. कोरोनाच्या काळात भारताने हार मानली नाही. स्वांतत्र्याच्या दीर्घ कालखंडानंतरही भारताने आपला प्रभाव कायम ठेवला. देशासमोर अन्नाच्या कमतरतेपासून ते कोरोनापर्यंत अनेक संकटे आली. देशाला मोठ्या युद्धांना सामोरे जावे लागले. मात्र, देशाने कधीही पराभव स्वीकारला नाही. देश सर्व संकटांना सामर्थ्याने आणि ताकदीने सामोरा गेला, असे पंतप्रधान म्हणाले.