राज्यसभेच्या उपाध्यक्षपदी नरेश गुजराल?, सर्वसहमतीसाठी भाजपाचे प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2018 01:26 PM2018-07-02T13:26:21+5:302018-07-02T13:30:50+5:30
नरेश गुजराल हे शिरोमणी अकाली दलाचे सदस्य आहेत.
नवी दिल्ली- राज्यसभेच्या उपाध्यक्षपदी सर्वांच्या सहमतीने नियुक्ती व्हावी यासाठी भारतीय जनता पार्टीने प्रयत्न सुरु केले आहेत. भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेत सर्वाधीक सदस्य असले तरी बहुमत नसल्यामुळे सत्ताधारी पक्षाला इतर पक्षांवर अवलंबून राहावे लागणार आहे. 1 जुलै रोजी पी. जे. कुरियन यांचा उपाध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर नवा उपाध्यक्ष कोण याची चर्चा सुरु झाली आहे. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी सत्ताधारी व विरोधकांना सर्व सहमतीने कुरियन यांच्या जागी योग्य व्यक्तीची नेमणूक करावी आसे आवाहन केले आहे.
Vice President #VenkaiahNaidu and External Affairs Minister #SushmaSwaraj bid farewell to outgoing Deputy Chairman of #RajyaSabha, PJ Kurien. pic.twitter.com/4pNQNJzHju
— APN NEWS (@apnnewsindia) July 2, 2018
या पदासाठी भारतीय जनता पार्टी अकाली दलाचे नरेश गुजराल यांचे नाव पुढे करेल अशी चर्चा आहे. त्यांना बिजू जनता दलाची साथ मिळेल असे सांगण्यात येते. यापुर्वी रालोआमध्ये नसलेल्या बिजू जनता दलाच्या खासदाराची या पदावर नियुक्ती व्हावी यासाठी भाजपाचे प्रयत्न होते.
#RajyaSabha deputy chairman election: Can united #Opposition win this battle? | @mausamii2u | https://t.co/tzAjznpdGLpic.twitter.com/bu6jOcGvek
— DailyO (@DailyO_) June 30, 2018
कुरियन आणि इतर अनेक मंत्री व खासदारांशी आपल्या निवासस्थानी बोलताना व्यंकय्या नायडू यांनी उपाध्यक्षपदासाठी निवडणूक टाळण्याचे आवाहन केले. सरकार व विरोधी पक्षांनी सर्व सहमतीने निवड करावी असे त्यांनी सुचवले. असे असले तरी काँग्रेस याची चर्चा यूपीएचे सदस्य पक्ष व इतर विरोधीपक्षांशी करेल अशी शक्यता आहे. तृणमूल काँग्रेसने भावी उपाध्यक्ष हा काँग्रेसचा नसावा यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. 18 जुलै रोजी संसदेचे मॉन्सून अधिवेशन सुरु होणार आहे.
कोण आहेत नरेश गुजराल ?
नरेश गुजराल हे माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांचे पूत्र आहेत. त्यांचा जन्म 19 मे 1948 रोजी पंजाबातील जालंधर येथे झाला. शिरोमणी अकाली दलातर्फे ते राज्यसभेत निवडून गेले आहेत. त्यांचे शिक्षण नवी दिल्लीमधील सेंट स्टीफन्स महाविद्यालयात झाले. राज्यसभेतील एक अभ्यासू खासदार म्हणून त्यांची ओळख आहे. गुजराल संसदेतील विविध अभ्यासविषयगटांचे सदस्य आहेत.