Narmada River ST Bus Accident: मध्य प्रदेशातील धार इथे झालेली बस दुर्घटना भीषण; नरेंद्र मोदींनी व्यक्त केलं दु:ख
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 03:08 PM2022-07-18T15:08:29+5:302022-07-18T17:31:42+5:30
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करत दु:ख व्यक्त केलं आहे.
नवी दिल्ली- मध्य प्रदेशमध्ये महाराष्ट्राच्या एसटी बसला झालेल्या भीषण अपघातात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तसेच अपघातात मरण पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याची कार्यवाही लगेच करावी असे निर्देशही एकनाथ शिंदे यांनी एसटी महामंडळाला दिले आहेत.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करत दु:ख व्यक्त केलं आहे. मध्य प्रदेशातील धार इथे झालेली बस दुर्घटना भीषण आहे. ज्यांनी आप्त गमावले त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. बचावकार्य सुरु आहे आणि स्थानिक प्रशासन दुर्घटनाग्रस्त लोकांना मदत करत आहेत. बस दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीकडून प्रत्येकी २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपये मदत नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली आहे.
An ex-gratia of Rs. 2 lakh each from PMNRF would be given to the next of kin of those who lost their lives due to the bus tragedy in Dhar, Madhya Pradesh. The injured would be given Rs. 50,000: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) July 18, 2022
१३ मृतांपैकी ७ जणांची ओळख पटली आहे. यापैकी चार जण हे महाराष्ट्रातील अकोला आणि अमळनेरचे आहेत. अद्याप काही प्रवासी बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. तसेच १५ जण वाचले आहेत. यापैकी ५-७ जण गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. एसटी प्रशासन, जिल्हा प्रशासनाने हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत. हेल्पलाईन क्रमांक घटनास्थळ मदतीसाठी ०९५५५८९९०९१ तर जळगाव जि. का. नियंत्रण कक्ष ०२५७२२२३१८०, ०२५७२२१७१९३ असे हे क्रमांक आहेत.