मोदी सरकारचे संकटमोचक थोडक्यात बचावले; चंद्राबाबूंच्या अगदी जवळून गेली ट्रेन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 05:46 PM2024-09-06T17:46:37+5:302024-09-06T17:46:53+5:30
पूरग्रस्त भागातील दुरुस्तीचे काम पाहणीसाठी नायडू विजयवाडा येथील मधुरा नगरच्या बुडामेरू नदीच्या रेल्वे पुलावर आले होते.
पूरग्रस्त भागाचा दौरा करताना मोदी सरकारचे संकटमोचक, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू बालबाल बचावले आहेत. रेल्वे ट्रॅकवरून चालत जात असताना अगदी जवळून रेल्वे गेली आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.
पूरग्रस्त भागातील दुरुस्तीचे काम पाहणी व नदीचा प्रवाह पाहण्यासाठी नायडू विजयवाडा येथील मधुरा नगरच्या बुडामेरू नदीच्या रेल्वे पुलावर आले होते. त्यांच्यासोबत त्यांचे सुरक्षा रक्षक, कार्यकर्ते आणि नेतेही होते. यावेळी त्या मार्गावरून रेल्वे येत होती. हॉर्न वाजवून रेल्वे चालकाने पुलावर जमलेल्या लोकांना सावध केले. रेल्वे चालकाला तिथे लोक कशासाठी जमले आहेत हे सांगणे कठीण होते. नाहीतर मुख्यमंत्र्यांच्या जिवाला धोका निर्माण होणारा प्रसंग उद्भवला नसता.
नायडू रेल्वे पुलावर उभे राहून बुडमेरू नदीच्या प्रवाहाची पाहणी करत होते. एक हायस्पीड ट्रेन त्यांच्या जवळून गेली. नाडूंनीही सोबतच्या लोकांना पुलावर अंग चोरून राहण्यासाठी सांगितले.
केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शुक्रवारी आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील पूरग्रस्त भागांचा दोन दिवसीय पाहणी दौरा सुरू ठेवला. कृषीमंत्र्यांनीही विजयवाडा गाठून शेतीची पाहणी केली आणि बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधला.