नासाला जे जमले नाही, ते भारताचा ‘आदित्य’ उपग्रह करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 02:02 AM2017-11-27T02:02:28+5:302017-11-27T02:03:07+5:30
अंतराळात मोक्याच्या ठिकाणाहून सूर्याचे निरीक्षण करून अभ्यास करण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संघटना (इस्रो) २०१९ किंवा २०२० मध्ये ‘आदित्य एल-१’ हा उपग्रह सोडण्याची जय्यत तयारी करत आहे.
चेन्नई : अंतराळात मोक्याच्या ठिकाणाहून सूर्याचे निरीक्षण करून अभ्यास करण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संघटना (इस्रो) २०१९ किंवा २०२० मध्ये ‘आदित्य एल-१’ हा उपग्रह सोडण्याची जय्यत तयारी करत आहे. नासाला जे जमले नाही ते भारताचा ‘आदित्य’ उपग्रह करणार आहे.
उपग्रहाच्या प्रस्तावित नावातील ‘आदित्य’ हे सूर्याचे नाव आहे तर ‘एल-१’ हे अंतराळातील त्याच्या स्थानाचे निदर्शक आहे. ‘एल-१’ म्हणजे लॅगरेंज पॉईंट’ हे स्थान पृथ्वीपासून १५ लाख किमी दूर आहे. ‘आदित्य’ उपग्रह पृथ्वीवरून सोडल्यानंतर सुमारे तीन महिन्यांत या स्थानापर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा आहे. त्या स्थानावर पोहोचल्यावर तो स्वत:भोवती घिरट्या घेत सूर्यनिरीक्षणाचे काम करेल.
‘एल-१’ हे ठिकाण गुरुत्वीय शक्तींच्या अशा हद्दीवर आहे की तेथे ‘आदित्य’ला आपल्या कक्षेत स्थिर राहण्यासाठी फारशा ऊर्जेची गरज भासणार नाही. हे ठिकाण असे मोक्याचे असेल की तेथून सूर्य ‘आदित्य’च्या कधीही नजरेआड जाणार नाही. अशा मोक्याच्या ठिकाणी राहून सूर्याच्या चुंबकीय क्षेत्राचे निरीक्षण व अभ्यास करणारा हा पहिला आणि एकमेव उपग्रह असेल.
सूर्य दर ११ वर्षांनी अधिक तेजस्वी होतो, असे मानले जाते. अशा प्रत्येक कालखंडाच्या सुरुवातीस सूर्याच्या पृष्ठभागावर डाग दिसू लागतात. हळूहळू ते मोठे मोठे होत जाऊन पुन्हा बारीक होतात. सूर्याच्या नवतेजाचे पुढील सत्र बहुधा सन २०१९ किंवा २०२० मध्ये सुरु होईल व त्याच सुमारास ‘आदित्य’चे प्रक्षेपण करण्याची योजना आहे. या उपग्रहाचे निर्धारित आयुष्य पाच वर्षांचे असले तरी तो १० वर्षांपर्यंतही काम करत राहू शकेल. तसे झाले तर सूर्याच्या पृष्ठभागावर १२ वर्षांच्या कालखंडात होणाºया सर्व बदलांचे सलगपणे निरीक्षण आणि अभ्यास करणे शक्य होईल, अशी अपेक्षा आहे.
याआधी अंतराळातील ‘एल-१’ या स्थानी आणखीही काही उपग्रह सोडले गेले आहेत. त्यात अमेरिकेची ‘नासा’ व युरोपीय अंतराळ संशोधन संस्थेने संयुक्तपणे सोडलेला सोडलेला सोलर अॅण्ड हेलिओस्फीरिक आॅब्झर्व्हेटरी (एसओएचओ) आणि ‘नासा’चा ‘अॅडव्हान्स्ड कॉम्पोझिशन एप्लोरर (एसीई) यांचा समावेश आहे. यापैकी ‘एसओएचओ’ उपग्रह सूर्याच्या तर ‘एसीई’ उपग्रह अंतराळातील वातावरणाच्या अभ्यासासाठी सोडला गेला. १९९५ मध्ये सोडल्यापासून ‘एसओएचओ’ने अनेक शोध लावले मात्र, सूर्याच्या प्रतिमा घेऊन त्यांचा अभ्यास करण्यास त्यावर बसविलेले ‘कॉरोनोग्राफ’ हे उपकरण लगेचच नादुरुस्त झाल्याने सध्या सूर्याच्या तेजोवलयाचा (कॉरोना) अभ्यास करणारा एकही उपग्रह अंतरालात नाही. ही उणीव भारताचा ‘आदित्य’ भरून काढेल.
सूर्याच्या तेजोवलयाचा अभ्यास करणारी, सर्व तरंगलहरींमध्ये सूर्याच्या प्रतिमा टिपणारी व पुनर्तेजस्वीतेच्या कालखंडात सूर्यापासून उत्सर्जित होणाºया भारित कणांचा शोध घेणारी वैज्ञानिक उपकरणे ‘आदित्य’वर असतील. हा उपग्रह आणि उपकरणे देशी बनावटीची असतील. उपग्रहाची पहिली सैंधांतिक कल्पना ‘इस्रो’च्या वैज्ञानिकांनी सन २००८ मध्ये मांडली तेव्हा त्यावर एकच उपकरण असेल व उपग्रहाचे वजन ४०० किलो असेल असे गृहित धरले गेले होते. (वृत्तसंस्था)
‘आदित्य’ची गुणवैशिष्ट्ये
- एकूण वजन अंदाजे
१,५०० किलो
- एकूण उपकरणे सात. त्यांचे वजन २५० किलो
- सर्वात मोठे उपकरण ‘व्हिजिबल इमिशन लाइन कॉरोनाग्राफ’ (व्हीएलइसी) वजन १७० किलो
- ‘सोलर अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप’, वजन ३५ किलो.
- याखेरीज ‘एक्स-रे स्पेक्ट्रोमिटर’