पंजाब-हरयाणात वाढतायत शेतातील कडपे जाळण्याचे प्रकार, नासाकडून फोटो प्रसिद्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2019 09:53 AM2019-10-30T09:53:00+5:302019-10-30T09:53:14+5:30
दिल्ली आणि एनसीआरमध्ये दिवसेंदिवस प्रदूषण वाढत चाललं आहे.
नवी दिल्लीः दिल्ली आणि एनसीआरमध्ये दिवसेंदिवस प्रदूषण वाढत चाललं आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि इतर प्रदूषणाच्या गुणवत्तेची चाचणी करणाऱ्या संस्थांच्या मते दिल्लीतल्या आजूबाजूला असलेले राज्य पंजाब आणि हरयाणात कापलेल्या भातातील कडपे जाळण्याचे प्रकार वाढले आहेत, त्याचा परिणाम म्हणून दिल्लीतलं प्रदूषण वाढत असल्याचाही निष्कर्ष त्यांनी नोंदवला आहे.
नासानं घेतलेल्या फोटोमधून हे सिद्ध होतंय की, भात कापून झाल्यानंतर शेतात उरलेले कडपे शेतकरी जाळतात, त्यामुळेच प्रदूषणात वाढ होते, असा दावाही या यंत्रणांनी केला आहे. नासानं दिल्लीला लागून असलेल्या काही राज्यांचे सेटलाइटच्या माध्यमातून फोटो घेतले आहेत. या फोटोमध्ये 'रेड स्पॉट' शेतात भात कापून झालेल्या कडप्यांना लावलेली आग दर्शवत आहेत. पंजाब आणि हरयाणात शेतातले कडपे जाळण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. त्यामुळे दिल्ली आणि आजूबाजूच्या राज्यात प्रदूषण वाढतच आहे.
अशाच दिल्ली सरकारनं प्रदूषण कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. त्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनीही एक ट्विट केलं आहे. त्यात ते म्हणतात, पंजाब आणि हरयाणच्या सरकारला माझी हात जोडून विनंती आहे की, दिल्लीला गॅस चेंबर बनवण्यापासून रोखण्यासाठी काही ठोस पावलं उचला. आम्ही आमच्या पातळीवर लागोपाठ प्रयत्न करत आहोत. प्रदूषण नियंत्रित करण्याचे प्रयत्न पुढेसुद्धा सुरूच ठेवू. नासानं दिलेल्या फोटोतून स्पष्ट दिसत आहे की, शेतातील कडपे जाळण्याचे प्रकार कमी होण्याऐवजी वाढतच चालले आहेत. तसेच दिवाळीमध्ये फोडण्यात आलेल्या फटाक्यांनीही दिल्ली-एनसीआरच्या प्रदूषणात वाढ केलेली आहे. सेंटर फॉर सायन्स इन्व्हायरन्मेंट(सीएसई)च्या रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे.