नासाच्या फोटोंमध्ये दिसली पंजाब-हरियाणाच्या शेतातली आग, प्रदुषणाचा धोका वाढला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 12:25 PM2021-10-06T12:25:35+5:302021-10-06T12:26:04+5:30
Delhi-NCR Air Pollution: शास्त्रज्ञ आणि पर्यावरणतज्ज्ञांनी या वर्षीची आग अतिशय तीव्र असण्याची शक्यता वर्तवली आहे.
नवी दिल्ली: दरवर्षी प्रमाणे यंदाही दिल्ली-एनसीआरचे गॅस चेंबरमध्ये रुपांतर होणार आहे. दरवर्षी पंजाब, हरियाणा आणि पाकिस्तानच्या काही भागांमधील शेतात मोठ्या प्रमाणावर भुसा जाळला जातो. यामुळे दिल्ली-एनसीआरला प्रचंड वायू प्रदुषणाचा सामना करावा लागतो. या वर्षीही हे चित्र पाहायला मिळणार आहे. अमेरिकेतील अंतराळ संस्था NASA च्या व्हीआयआयआरएस उपग्रहाने टिपलेल्या चित्रांमध्ये या भागात लाल ठिपके दिसत आहेत. हे लाल ठिपके या परिसरातील आगीचे आहेत.
हरियाणा, पंजाब आणि पाकिस्तानच्या काही भागांमध्ये भुसा जाळणे सुरू झाले आहे. नासाच्या अग्नी नकाशावरुन हे दिसून आले आहे. या अग्नी नकाशामध्ये हे क्षेत्र रेड अलर्ट म्हणून दाखवण्यात आले आहे. दरम्यान, शास्त्रज्ञ आणि पर्यावरणतज्ज्ञांनी यंदाचा मान्सून उशीरा आल्यामुळे या वर्षी उत्तर भारतातील शेतात लावली जाणारी आग अनेक वर्षांच्या तुलनेत अधिक तीव्र असण्याची शक्यता वर्तवली आहे. या आगीमुळे दिल्लीतील हवा आणखी प्रदूषित होऊ शकते.
या शहरांमध्ये लावली जाते आग
पंजाबच्या अमृतसर, जालंधर, लुधियाना, चंदीगड आणि फरीदाबाद सारख्या जिल्ह्यांमध्ये आगीचे केंद्र आहे. तर, पाकिस्तानच्या लाहोर, फैसलाबाद, गुजरानवाला आणि सरगोधाच्या आसपास शेतात ही आग दिसून आली आहे. नासाच्या डेटा मॅपवर नजर टाकली तर, 1 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान पंजाब आणि हरियाणामध्ये भुसा जाळण्याच्या घटनेत झपाट्याने वाढ झाल्याचे दिसून येते.