मोठी बातमी! कोरोनाच्या नेझल लसीच्या वापराला भारतात परवानगी, जाणून घ्या सविस्तर...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 05:43 PM2022-12-22T17:43:26+5:302022-12-22T17:43:56+5:30
जागतिक पातळीवर कोरोनाचा पुन्हा एकदा उद्रेक होत असताना भारतात आता कोरोना विषाणू विरोधातील नेझल लसीच्या वापराला परवानगी देण्यात आली आहे.
नवी दिल्ली-
जागतिक पातळीवर कोरोनाचा पुन्हा एकदा उद्रेक होत असताना भारतात आता कोरोना विषाणू विरोधातील नेझल लसीच्या वापराला परवानगी देण्यात आली आहे. कोरोना विरोधातील लसींना मान्यता देणाऱ्या तज्ज्ञांच्या समितीने आज नेझल लसीला परवानगी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विरोधातील तयारीचा आढावा घेत उच्चस्तरिय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीनंतर नेझल लसीला मान्यता देण्यात आली आहे.
कोरोना लसीचं इंजेक्शन घेण्याची इच्छा नसणाऱ्या लोकांसाठी नेझल लस हा मोठा दिलासा ठरणार आहे. नाकावाटे स्प्रेच्या स्वरुपात दिली जाणारी लस इंजेक्टेबल लसीपेक्षा चांगली मानली जात आहे. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखालील आजच्या उच्चस्तरिय बैठकीला केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, आरोग्य सचिव राजेश भूषण, नीती आयोगाचे डॉ व्ही के पॉल व्हिडिओ कॉलद्वारे उपस्थित होते.
नेझल लस चांगली आहे का?
कोरोना लसीच्या तुलनेत नाकावाटे दिली जाणारी लस फायदेशीर आहे. कारण या लसीची साठवण, वितरण आणि कमी कचरा निर्मिती यासोबतच विषाणूचे एन्ट्री पॉइंट असलेल्या नाक आणि श्वसनमार्गाला संरक्षण नेझल लस प्रदान करते. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी जनतेला लसीकरण करून घेण्याचं आणि गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्यासोबतच कोविड नियमांचे पालन करण्याचं आवाहन केलं आहे.
१ डिसेंबर रोजी भारताच्या सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) ने १८ आणि त्याहून अधिक वयोगटातील लोकांना आणीबाणीच्या परिस्थितीत प्रतिबंधित वापरासाठी भारतानं विकसित केलेल्या जगातील पहिल्या इंट्रा-नेझल लस मंजूर केली होती. चीनने देखील इनहेलेबल लस तसेच नेझल-स्प्रे लस मंजूर केली आहे. रशिया आणि इराणनेही त्यांच्या स्वतःच्या नेझल लस विकसित केल्या आहेत.
दरम्यान, गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतात १८५ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर सक्रिय रुग्णांची संध्या ३,४०२ इतकी आहे.