नसीमुद्दीन ब्लॅकमेलर, ऑडिओ टेपसोबत केली छेडछाड, मायावतींचा पलटवार
By admin | Published: May 11, 2017 09:43 PM2017-05-11T21:43:30+5:302017-05-11T21:58:58+5:30
बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावतींनी नसीमुद्दीन सिद्दिकींवर पलटवार केला आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 11 - बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावतींनी नसीमुद्दीन सिद्दिकींवर पलटवार केला आहे. नसीमुद्दीन सिद्दिकी हे ब्लॅकमेलर आहेत. जी व्यक्ती स्वतःच्या पार्टीच्या नेत्यांचे फोन रेकॉर्डिंग करते ती कोणाची कशी होईल. नसीमुद्दीन कोणाचेच होऊ शकत नाहीत. नसीमुद्दीनविरोधात पश्चिम उत्तर प्रदेश, लखनऊ मंडळ आणि उत्तराखंडमधून मला पक्षांच्या नेत्यांच्या तक्रारी आल्या होत्या.
पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं की, ज्यांना तुम्ही वर देत होते. त्यांना तात्काळ न हटवल्यास पक्ष पुढे वाढणार नाही. पक्ष वाढण्याच्या ऐवजी अधोगतीकडे जाईल, असंही पक्षाच्या नेत्यांनी नसीमुद्दीनबाबत सांगितल्याचं मायावतींनी स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच नसीमुद्दीन हा मोठा ब्लॅकमेलर असल्याचंही मायावती म्हणाल्या आहेत. पार्टी नेत्यांचेही फोन टॅप करून नसीमुद्दीन कार्यकर्त्यांना कामं न केल्यास फोन टॅपिंग बहनजींना दाखवेन, अशा प्रकारच्या धमक्या देत होता, असा खुलासाही मायावतींनी केला आहे.
काही वेळापूर्वीच बहुजन समाज पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेल्या नसीमुद्दीन सिद्दिकींनी मायावतींवर गंभीर आरोप केले आहेत. मायावतींनी निवडणुकीतल्या पराभवानंतर मुस्लिमांना गद्दार म्हणून संबोधल्याचा आरोपही नसीमुद्दीन सिद्दिकी यांनी केला आहे. तसेच मुस्लिमांबाबत मायावतींनी असंसदीय भाषाही वापरली आहे. आज पत्रकार परिषद घेऊन सिद्दिकींनी मायावतींवर गंभीर आरोप केले आहेत. मायावतींची एक ऑडियो टेपही सिद्दिकी यांनी पत्रकारांना ऐकवली आहे. सिद्दिकींनी मायावतींच्या रेकॉर्डिंगचे जवळपास 150 टेप असल्याचंही सांगितलं आहे.
सिद्दिकी म्हणाले होते, उत्तर प्रदेशच्या निवडणुकांनंतर मायावतींनी मला दिल्लीत बोलावलं. माझ्यासोबत मुलगा अफझलही होता. त्यांनी मला विचारलं मुस्लिमांनी बीएसपीला मतं काही नाही दिली ?, मी म्हटलं बहनजी असं काही नाही आहे. मुस्लिमांनी बीएसपीला मत दिलं आहे. जोपर्यंत काँग्रेस आणि समाजवादी पार्टीची आघाडी झाली नव्हती तोपर्यंत मुस्लिम आपल्यासोबत होते. मात्र त्या दोन पक्षांची आघाडी झाल्यानंतर मुस्लिमांच्या मतांमध्ये धुव्रीकरण झाले. आम्हालाही त्यांची मतं मिळाली. मात्र पहिले ज्या संख्येनं मुस्लिम पाठीशी होते त्याप्रमाणात मतं मिळाली नाहीत. त्यावेळी मायावतींनी माझ्या वक्तव्याशी सहमत नसल्याचं सांगितलं. तसेच त्यानंतर एक दिवशी मला बोलावलं आणि पार्टीला 50 कोटींची गरज असल्याचं सांगितलं. मी म्हटलं माझ्याजवळ एवढा पैसा कुठे आहे. त्यांनी मला मालमत्ता विकण्यास सांगितली.