नसीरुद्दीन-अनुपम यांच्यात जुंपली
By admin | Published: May 29, 2016 01:04 AM2016-05-29T01:04:27+5:302016-05-29T01:04:27+5:30
काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरून बॉलीवूड स्टार नसीरुद्दीन शाह आणि अनुपम खेर यांच्यात जुंपली आहे. काश्मिरी पंडितांबाबत आपण चालविलेल्या मोहिमेवर टीका करणाऱ्या नसीरुद्दीन
नवी दिल्ली : काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरून बॉलीवूड स्टार नसीरुद्दीन शाह आणि अनुपम खेर यांच्यात जुंपली आहे. काश्मिरी पंडितांबाबत आपण चालविलेल्या मोहिमेवर टीका करणाऱ्या नसीरुद्दीन शाह यांचे विधान दुर्भाग्यपूर्ण असल्याचे अनुपम खेर यांनी म्हटले आहे.
एका वृत्तसंस्थेशी बोलताना अनुपम खेर म्हणाले की, प्रथम मला विश्वासच बसला नाही की, नसीरुद्दीन शाह हे असे काही बोलू शकतात. पण, त्यांनी असे म्हटले असेल तर निश्चित हे दुर्भाग्य आहे. नसीरुद्दीन हे राष्ट्रीय नाट्य विद्यालयात त्या काळात मला वरिष्ठ होते.
मी त्यांचा खूप सन्मान करतो. पण काश्मीरशी माझा काही संबंध नाही, ही बाब मान्य जरी केली तरी तेथील नागरिकांबाबत मी प्रश्न उपस्थित करू शकत नाही का? त्यांनी असे विधान का केले हे मी सांगू शकत नाही. पण त्यांच्या तर्कानुसार विदेशातील भारतीय नागरिकांना भारतासाठी काम करण्याचा अधिकार नाही किंवा दिल्लीत राहणारा एखादा व्यक्ती गुजरातच्या समस्येवर आवाज उठवू शकत नाही. नसीरुद्दीन शाह यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती.
काय आहे वाद?
काश्मिरी पंडितांसाठी मोहीम चालविणाऱ्या अनुपम खेर यांच्याविषयी विचारणा करण्यात आली तेव्हा नसीरुद्दीन शाह म्हणाले होते की, काश्मिरी पंडितांच्या हक्कासाठी अशी व्यक्ती संघर्ष करत आहे जी व्यक्ती कधी काश्मिरात राहिलीच नाही आणि विस्थापित झाली आहे.