नसीरुद्दीन शाह, जावेद अख्तर, शबाना यांनी केला फ्रान्स हल्ल्याचा निषेध
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2020 02:05 AM2020-11-02T02:05:45+5:302020-11-02T06:56:22+5:30
France terror attack: फ्रान्समधील हल्ल्यांचा निषेध करीत १३० भारतीय नागरिकांनी एक निवेदन जारी केले आहे. यात बॉलीवूड अभिनेते, लेखक, वकील, सामाजिक कार्यकर्ते आदी लोकांचा समावेश आहे.
नवी दिल्ली : फ्रान्समध्ये अलीकडच्या काही दिवसांत झालेल्या घटनांनंतर जगात याचे पडसाद उमटले आहेत. बॉलीवूड अभिनेते नसरुद्दीन शाह, शबाना आझमी, स्वरा भास्कर, गीतकार जावेद अख्तर, लेखक तुषार गांधी, वकील प्रशांत भूषण यांच्यासह विविध क्षेत्रांतील १०० पेक्षा अधिक भारतीय नागरिकांनी एकजूट दाखवीत धर्माच्या नावावर फ्रान्समध्ये झालेल्या हत्यांचा निषेध केला आहे.
फ्रान्समधील हल्ल्यांचा निषेध करीत १३० भारतीय नागरिकांनी एक निवेदन जारी केले आहे. यात बॉलीवूड अभिनेते, लेखक, वकील, सामाजिक कार्यकर्ते आदी लोकांचा समावेश आहे. एका संयुक्त निवेदनात त्यांनी फ्रान्समधील हल्ल्यांचा निषेध केला आहे आणि काही मुस्लिम धार्मिक आणि राजकीय नेत्यांनी केलेल्या अपमानास्पद विधानांचाही समाचार घेतला आहे. एकूण १३० लोकांच्या यावर स्वाक्षऱ्या आहेत. फ्रान्समधील दोन हल्लेखोरांना कट्टरपंथी असल्याचे यात म्हटले आहे. तसेच, हत्येला तर्कसंगत म्हणणाऱ्या भारतीय मुस्लिमातील काही स्वयंभू लोकांमुळे आम्ही त्रस्त असल्याचेही यात म्हटले आहे. कोणत्याही धर्माच्या नावावरील अपराध कोणतेही कारण देऊन स्वीकार करता येणार नाहीत.