Naseeruddin Shah : 'मुस्लीम नरसंहाराचं आवाहन करणारे गृहयुद्धाला निमंत्रण देताहेत'; नसीरुद्दीन शाहांनी व्यक्त केला संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 12:22 PM2021-12-29T12:22:04+5:302021-12-29T12:48:24+5:30
Naseeruddin Shah : धर्म संसदेमध्ये करण्यात आलेल्या वादग्रस्त विधानावर नसीरुद्दीन शाह यांनी आता आपली प्रतिक्रिया दिली आहे.
नवी दिल्ली - ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांनी धर्म संसदेमध्ये करण्यात आलेल्या वादग्रस्त विधानावर आता आपली प्रतिक्रिया दिली आहे. "जे लोक मुस्लिमांच्या नरसंहाराचं आवाहन करत आहेत ते लोक खरं तर देशामधील गृहयुद्धाला निमंत्रण देत आहेत" अशा शब्दांत आपला संताप व्यक्त केला आहे. 'द वायर'ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये नसीरुद्दीन शाह यांनी वरिष्ठ पत्रकार करण थापर यांच्याशी चर्चा करताना याबाबत भाष्य केलं आहे.
"सध्या जे काही सुरू आहे ते पाहून धक्का बसतो. वादग्रस्त विधानं करणारे नक्की काय बोलत आहेत याचा त्यांना अंदाजही नसावा. ते लोक ज्या प्रकारचं आवाहन करत आहे ते एखाद्या गृहयुद्धाप्रमाणे आहे" अशी जोरदार टीका शाह यांनी केली आहे. 20 कोटी लोकसंख्येला तुम्ही अशाप्रकारे संपवण्याचं विधान करू शकत नाही असं नसीरुद्दीन शाह यांनी म्हटलं आहे. तसेच अशाप्रकारच्या विधानांविरोधात लढण्यासाठी मुस्लीम तयार आहेत असाही विश्वास व्यक्त केला आहे.
"मुस्लीम अशा विधानांविरोधात लढण्यास तयार"
"मुस्लीम अशा विधानांविरोधात लढण्यास तयार आहेत कारण आम्ही सर्वजण इथलेच आहोत. आमच्या पिढान्पिढ्या येथेच राहिल्यात आणि येथेच मरण पावल्यात. जे लोक अशाप्रकारची वादग्रस्त आणि भावना भडवणारी विधानं करत आहेत ते लोक नक्की काय बोलतायत त्यांचा त्यांना अंदाज नसेल" असा सणसणीत टोलाही शाह यांनी लगावला आहे. अशाप्रकारच्या विधांनाविरोधात कोणत्याही प्रकारचं आंदोलन सुरू झालं तर त्याने मोठं नुकसान होईल असं आपल्याला वाटत असल्याचंही नसीरुद्दीन शाह यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.