नशीबवानाला मिळाली मुलगी
By Admin | Published: June 7, 2017 12:25 AM2017-06-07T00:25:00+5:302017-06-07T00:25:00+5:30
कितीही चांगले काम केले तरी जे मिळायचे तेच मिळते, असे लोक म्हणतात
कितीही चांगले काम केले तरी जे मिळायचे तेच मिळते, असे लोक म्हणतात; परंतु या रिक्षावाल्याची कथा वाचून तुम्हीही म्हणाल की, चांगले काम कधी वाया जात नाही. बबलू शेख हे ३० वर्षांपासून रिक्षा चालवतात. एक तरुणी रेल्वेखाली आत्महत्या करायला निघाली असताना तिला त्यांनी वाचवले. ती त्यांना म्हणाली मला कधी पुन्हा भेटू नका. त्यांनीही कधी ही बाब कोणाला सांगितली नाही. आठ वर्षांनंतर बबलू रुग्णालयात वेदना सहन करीत असताना तीच तरुणी एका कथेसह तेथे आली व तिने बबलूच्या सगळ्या वेदना पळवल्या.
फेसबुक युझर जीएमबी आकाशने ही अनोखी कथा शेअर केली व तिला हजारो लोकांनीही शेअर केले. बबलूंनी सांगितले की, त्यांना मुलीची खूप हौस होती; परंतु त्यांना तिन्ही मुलेच होती. ते बायकोला म्हणायचे की, मुलगी नशीबवानालाच मिळते. आपल्या नशिबात मुलगी नाही.
बबलूंनी सांगितले की, एकदा एकाने मला त्याच्या तरुण मुलीला कॉलेजमध्ये सोडण्यासाठी माझी रिक्षा मागवली. थोड्या अंतरावर मला तिचा रडण्याचा आवाज ऐकू आला. मी तिला विचारले, तर तिने मला झिडकारले. मागे बघू नका, असेही सांगितले. नंतर तिने रिक्षा थांबवली व कोणाशी तरी फोनवर बोलू लागली. ती सतत रडत व ओरडत होती. त्यावरून मला अंदाज आला की, तिला घरातून पळून जायचे आहे. मला राग आला व बरे झाले आपल्याला मुलगी नाही ते, असेही वाटले. तिने अचानक रिक्षातून उडी मारली व रेल्वेरुळांकडे धावली. बहुधा तिला आत्महत्या करायची असावी. मी म्हणालो जाऊ द्या. आपल्याला काय करायचे आहे? तिच्या मागे धावत मी रेल्वे रुळांवर पोहोचलो. मी तिला समजावून सांगायचा प्रयत्न केला; परंतु तिने मला झिडकारले, बेवकूफ म्हणाली. ती जोरजोरात रडत होती. मी तिला रडू दिले म्हणजे ती शांत होईल. निर्मनुष्य भागात तिला एकटीला सोडून जायची माझी तयारी नव्हती. तिच्यासाठी मी काही तास तेथेच थांबलो. नंतर पाऊस सुरू झाला. ही घटना आठ वर्षांपूर्वीची.’
एकदा मला रिक्षा चालवताना अपघात झाला. रुग्णालयात मी शुद्धीवर आल्यावर एक तरुणी माझ्या जवळ उभी होती. तिने माझा हात धरून मला विचारले की, मला भेटायला माझ्या घरी का आला नाहीत? ही तरुणी कोण हे मला आठवत नव्हते. तिने मला मोठ्या डॉक्टरकडे नेले व हे माझे वडील आहेत, असे सांगितले. यांनी त्यावेळी मला आधार दिला नसता, तर मी डॉक्टर बनले नसते, असे ती म्हणाल्यावर माझ्या डोळ्यांत पाणी आले. माझा आनंद गगनात मावत नव्हता. काही वर्षांपूर्वी भेटलेली ही मुलगी आज डॉक्टर बनून मला मिळाली होती, असे बबलूंनी सांगितले.