"नसरुल्लाहपासून माझ्या आणि मुलांच्या जीवाला धोका"; अंजूच्या नवऱ्याची पोलिसांत धाव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2023 11:49 AM2023-08-06T11:49:42+5:302023-08-06T11:50:30+5:30
अंजूने पाकिस्तानात जाऊन इस्लाम धर्म स्वीकारला असून, तिने नसरुल्लासोबत निकाह देखील केला आहे. पाकिस्तानमध्ये इस्लाम धर्म स्वीकारणारी अंजू आता फातिमा झाली आहे.
राजस्थानमधील भिवडी येथे राहणारी अंजू पती आणि दोन मुलांना सोडून 21 जुलै रोजी पाकिस्तानात गेली. अंजूने पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह नसरुल्लाहशी फेसबुकवर मैत्री केली होती. यानंतर दोघे प्रेमात पडले. पती अरविंदला जयपूरला मित्राला भेटण्यासाठी जात असल्याचं सांगून अंजू निघून गेली होती. पण जेव्हा ती पाकिस्तानात पोहोचली तेव्हा मीडियामध्ये बातम्या येऊ लागल्या, त्यानंतर ही गोष्ट समोर आली.
अलवर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या अंजूने पाकिस्तानात जाऊन इस्लाम धर्म स्वीकारला असून, तिने नसरुल्लासोबत निकाह देखील केला आहे. पाकिस्तानमध्ये इस्लाम धर्म स्वीकारणारी अंजू आता फातिमा झाली आहे. तिथून तिने पती अरविंदला फोन करून धमकी दिली. पाकिस्तानमधील एका व्यावसायिकाने अंजूला राहण्यासाठी घर भेट म्हणून देऊ केले आणि नोकरी देणार असल्याचंही म्हटलं आहे.
अंजूचा पती अरविंद याने अंजू आणि नसरुल्लाविरुद्ध राजस्थानमधील अलवरमध्ये गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये अरविंदने दोघांवर गंभीर आरोप केले आहेत. अंजूचे पती अरविंद यांनी सांगितले की, नसरुल्लाहपासून त्याच्या आणि मुलांच्या जीवाला धोका आहे. अंजू विवाहित आहे आणि तिचा घटस्फोट झालेला नाही हे नसरुल्लाला माहीत होते, तरीही त्याने अंजूला पाकिस्तानात बोलावले.
तक्रार नोंदवताना अरविंदने म्हटले आहे की, पाकिस्तानच्या नसरुल्लाहने फेसबुकच्या माध्यमातून अंजूशी संपर्क साधला. तिला खोटी स्वप्नं दाखवली. आपल्या प्रेमासाठी अंजू देखील पाकिस्तानात गेली. सुरुवातीला तिने पतीला आपण परत भारतात येणार असल्याचं सांगितलं. पण नंतर निकाह केल्याने सर्वांनाच धक्का बसला. आता या घटनेची चर्चा सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.